मॉन्सून आता लवकरच येणार! 19 मे रोजी अंदमानात दाखल होणार

राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाने तडाखा बसला आहे. मुंबईसह, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. वळीवाचा पाऊस म्हणजे मॉन्सूनची चाहूल समजली जाते. आता वळीवाचा पाऊस आल्याने मान्सूनचे आगमन कधी होणार आणि असह्य उकाड्यापासून सुटका होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता हवामान खात्याने मॉन्सूनबाबत दिलासादायक बातमी दिली आहे.

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 19 मे रोजी दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये प्रवेश करतील. मॉन्सूनने केरळात प्रवेश केल्यावर हिंदुस्थानात मॉन्सूनचे आगमन होते. हवामान खात्याने मॉन्सून अंदामानात कधी दाखल होणार याचा अंदाज वर्तवला असला तरी मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मॉन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर साधारण आठवडाभर ते 12 दिवसात तो केरळमध्ये येतो. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

दरवर्षी साधरण मान्सूनचा 21 मे रोजी च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 8 जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी राज्यात मान्सूनला येण्यास विलंब झाला होते. गेल्या वर्षी 16 जूनला मॉन्सून राज्यात दाखल होता. मात्र, यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर होणार आहे.

एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर मुंबई आणि कोकणाच्या परिसरात उकाडा असह्य होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने मॉन्सूनच्या आगमनाचा संकेत दिले आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान सराकरीएवढे असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. तसेच आता नागरिकांनाही उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे.