अफगाणिस्तानात तयार झाला कमी दाबाचा पट्टा, हिंदुस्थानात अवकाळी पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानात हवामानात अचानक बदल झाला असून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे अनेक भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारवा जाणवत आहे. सामान्यतः असे वातावरण हिवाळ्यात तयार होतं. पण यावेळी मार्चमध्येच असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जाणवणारी तीव्र उष्णता अचानक कमी झाली आहे.

या हवामान प्रणालीची खास बाब म्हणजे तिची रचना. अफगाणिस्तानपासून पाकिस्तानमार्गे हिंदुस्थानापर्यंत सरळ रेषेत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अशी सरळ रचना फार क्वचित पाहायला मिळते. त्यामुळे या प्रणालीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. या बदलामुळे अनेक भागांत वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे सुरू झाले आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

या प्रणालीच्या आगमनापूर्वी दिल्लीसह अनेक शहरांत तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत गेले होते, ज्यामुळे मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता पावसामुळे तापमान 3 ते 7 अंशांनी घटले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 मार्चपर्यंत उत्तर-पश्चिम हिंदुस्थानात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट, वेगवान वारे आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

एकूणच, या दुर्मिळ वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी, वादळी हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.