वेब न्यूज : नॉट्रे डॅम डी पॅरिसची आग आणि रोबो फायर फायटरची कमाल

नॉट्रे डॅम डी पॅरिसची आग ही प्रत्येक फ्रेंच माणसासाठी अत्यंत दुःखद असा क्षण होती. देशातल्या विविध सरकारी विभागांनी यावेळी एकत्रितपणे काम करून या घटनेला धैर्याने तोंड तर दिलेच, पण अनेक नागरिकांचे प्राण आणि या पुरातन वास्तूचादेखील काही भाग संरक्षित केला. या सगळ्यात सध्या अनेकांच्या कौतुकाचा विषय होत आहे, तो अडीच फुटांचा रोबो फायर फायटर कोलोसस. ज्या रात्री या पुरातन वास्तूला आग लागली त्यावेळी मानवी अग्निशमन दल अर्थात ह्युमन फायर फायटर्सबरोबर कोलोससनेदेखील अत्यंत कौतुकास्पद असे बचाव कार्य पार पाडले. ‘वॉल-ई’पासून प्रेरणा घेऊन बनवलेल्या आणि एखाद्या सुरवंटासारख्या आकाराच्या कोलोससने आगीवर नियंत्रण मिळवणे, तापमान खाली आणणे, अडकलेले नागरिक आणि मानवी फायर फायटर्स यांच्यात ताळमेळ घालून देणे, पाण्याच्या मोठय़ा पाइपची वाहतूक करणे अशा अनेक गोष्टी करत बचाव कार्यात मोठी अभिमानास्पद कामगिरी पार पाडली. रोबो फायर फायटर्स आणीबाणीच्या प्रसंगात दोन प्रकारे मदत करू शकतात. पहिले म्हणजे आगीचा परिसर आणि ह्युमन फायर फायटर्स यांच्यामध्ये एक सेफ बफर झोन तयार करणे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे इतर किचकट कामांमधून ह्युमन फायर फायटर्सना मोकळे करून प्रत्यक्ष आग नियंत्रणासाठी त्यांना मोकळे करणे. कोलोससने तर या दोन्ही कामांबरोबरच अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे आणि या वास्तूतील प्राचीन आणि मौल्यवान गोष्टींना सुरक्षित जागी हलवणे अशी महत्त्वाची कामेदेखील पार पाडली. 1000 पौंड वजन असलेला कोलोसस त्याच्या वजनापेक्षा जास्त म्हणजे 1100 पौंड वजनाच्या यंत्रांना अथवा माणसांनादेखील वाहून नेऊ शकतो हे विशेष. कोलोससच्या जोडीलाच एरियल ड्रोन्स तंत्रज्ञानानेदेखील आग विझवण्यासाठी फायर फायटर्सना खूपच मदत केली. सुरक्षित रस्ते शोधणे, छतापर्यंत पोहोचण्यासाठी फायर फायटर्सना योग्य मार्ग सुचवणे अशी मोलाची कामगिरी या ड्रोन्सनेदेखील पार पाडली.