
>> स्पायडरमॅन
चीनने आपल्या देशात राबवलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’चा फटका आता त्या देशाला बसण्याची शक्यता वाढलेली आहे. जिनपिंग यांच्या या धोरणाला आधीच अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यात आता चीनमधील विदेशी कंपन्यांनीदेखील या धोरणाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. ‘ऍपल’सारखी मातब्बर मोबाईल उत्पादक कंपनी आता चीनच्या बाहेर हिंदुस्थान आणि व्हिएतनामसारख्या देशांत आपले उत्पादन वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असे समोर येत आहे. हिंदुस्थान आणि व्हिएतनामसारख्या देशांत पूर्वीपासून ऍपलच्या काही गॅझेट्सचे उत्पादन चालू आहे. आता हे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढविण्याचा कंपनी विचार करत आहे. एका अहवालानुसार हिंदुस्थानने गेल्या वर्षी जगातील आयफोन्सपैकी 3.1 टक्के आयफोन बनवलेले होते. आता हे उत्पादन 6 ते 7 टक्क्यांवर नेण्याच्या दृष्टीने ऍपल कंपनी विचार करत आहे. ऍपलसारख्या दिग्गज कंपनीने असे पाऊल उचलल्यास इतरही विदेशी कंपन्या तिच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हे आहेत. शांघाय आणि इतर प्रमुख शहरांमध्ये कडक लॉक डाऊन आहे. त्यामुळे मोठय़ा उत्पादक कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होत आहेत. एप्रिलमध्ये निव्वळ ऍपल कंपनीचे 8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी कंपनीचे अभियंते आणि अधिकारीही दोन वर्षांपासून चीनमध्ये येऊ शकलेले नाहीत. युक्रेन युद्धात चीन अप्रत्यक्षपणे रशियाला पाठिंबा देत आहे. अशा वेळी प्रमुख पाश्चात्त्य कंपन्यांना उत्पादन आणि मुख्य सामग्रीसाठी त्यांचे चीनवर असलेले अवलंबित्व कमी करायचे आहे. आकडेवारीनुसार, आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकसह ऍपलची 90 टक्क्यांहून अधिक उत्पादने ही चीनमध्ये बाह्य कंत्राटदारांद्वारे उत्पादित केली जातात. आशियाई देशांमध्ये चीननंतर हिंदुस्थान हा एकमेव असा देश आहे, जिथे मोठय़ा प्रमाणात कुशल कामगार उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत ऍपल हिंदुस्थानकडे पर्याय म्हणून पाहत आहे.





























































