वेब न्यूज – व्यसनामुळे आणीबाणी

>> स्पायडरमॅन

नशा मानवी जीवनाचा किती ऱ्हास करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन हा देश होय. इथल्या जनतेचे व्यसन इतक्या टोकाला गेले आहे की, देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे जाहीर करत इथले राष्ट्राध्यक्ष ज्यूलियस माडा बायो यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. या धोक्याचा उगम झाला आहे तो कुश नावाच्या सायकोऑक्टिव ड्रग्जमधून. हे ड्रग्ज अनेक विषारी पदार्थांना एकत्र करून बनवले जाते. या पदार्थांमधील महत्त्वाचा घटक हा मानवी हाडे आहेत. आता या ड्रग्जसाठी वेडेपिसे झालेले अनेक लोक मानवी हाडांसाठी कबरी खोदत आहेत आणि या हाडांच्या स्मगलिंगला अक्षरशः उधाण आले आहे. सिएरा लिओनमधील नागरिकांना या झोंबी ड्रग्जचे लागलेले व्यसन आता इथल्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करू लागले आहे. इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱया रुग्णांपैकी 65 टक्के जास्ती लोकांना या ड्रग्जचे व्यसन लागलेले आहे. या आकडेवारीवरून हे व्यसन किती प्रमाणात पसरले आहे याचा अंदाज येतो. अनेक तरुणांचे अवयव या व्यसनाने निकामी झालेले असून इतर गंभीर व्याधीदेखील उद्भवत आहेत. सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे ड्रग्ज आफ्रिकी देशांमध्ये दिसून आले. या ड्रग्जच्या अति सेवनाने अनेक लोक गंभीर आजारी पडलेले आहेत. ड्रग्जचा हा विळखा वाढत आहे. त्यातून मुक्तीसाठी काही सुजाण नागरिक आता एकवटले असून त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. सरकारने आणीबाणी लागू करण्यासोबत या व्यसनाला रोखण्यासाठी टास्क पर्ह्सदेखील तयार केला आहे. तसेच व्यसनाधीन लोकांना आधार देण्यासाठी प्रत्येक जिह्यात विशेष मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.