वेब न्यूज – फेसबुकवरून होलोकॉस्ट हटणार

‘होलोकॉस्ट’ ला जागतिक इतिहासात एक अतिशय दुर्दैवी इतिहास म्हणून बघितले जाते. ‘यहुदी नरसंहार’ या नावानेदेखील होलोकॉस्टला ओळखले जाते. दरवर्षी 27 जानेवारी या दिवसाला जगभर होलोकॉस्ट डे म्हणून ओळखले जाते. होलोकॉस्ट म्हणजे पृथ्वीवरून संपूर्ण यहुदी समाजालाच अस्तंगत करण्याची एक सूत्रबद्ध मोहीम होती असे मानले जाते. दुसऱया महायुद्धाच्या वेळेस जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने होलोकॉस्टच्या नावाखाली लाखो यहुदी लोकांना नजरकैदेत ठेवले होते. त्यातील तब्बल 11 लाख लोकांना गॅस चेंबरमध्ये कोंबून मारण्यात आले, तर इतर हजारो कैदी भूक आणि थंडीने मरण पावले. विश्व यहुदी काँग्रेस आणि अमेरिकन यहुदी काँग्रेस गेली अनेक वर्षे होलोकॉस्ट संदर्भातील चुकीची माहिती, द्वेष पसरवणाऱया गोष्टी यांना हटवण्याची मागणी फेसबुककडे करत आले आहेत. आता या सगळ्या प्रयत्नांना यश मिळाले असून फेसबुकने आपल्या ‘हेटस्पीच पॉलिसी’मध्ये मोठा बदल केला आहे आणि ती अपडेट केली आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने स्वतः यासंदर्भात पोस्ट टाकून माहिती दिली आहे. हिंसा, द्वेष पसरवणाऱया साहित्याला, खोटय़ा अफवांना आणि होलोकॉस्टसारख्या गोष्टींना चिथावणी देणाऱया कोणत्याही प्रकारच्या साहित्याला फेसबुकवरती जागा नसेल, असे मार्क झुकरबर्गने स्पष्ट केले आहे. त्याच्या या निर्णयाचे विश्व यहुदी काँग्रेस आणि अमेरिकन यहुदी काँग्रेसने जोरदार स्वागत केले आहे. गेल्या काही काळापासून सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अफवा पसरवणे, धार्मिक विद्वेष पसरवणाऱया खोटय़ा पोस्ट टाकून जमावाला चिथावणी देणे, लोकांना अराजकता माजवायला उद्युक्त करणे, खोटय़ा राजकीय बातम्या पसरवणे आणि विशेषतः होलोकॉस्ट आणि त्यासंदर्भातील हिंसक टिपण्या या गोष्टींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक विचारवंतांनी यामुळे होणाऱया परिणामांबद्दल मोठय़ा प्रमाणावरती काळजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सदेखील अशा गोष्टींना आळा घालायला सज्ज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या