वेब न्यूज – अंतराळातील कचऱयाची समस्या

हिंदुस्थानच्या चांद्रयान आणि ‘आदित्य एल-1’ या सूर्ययानाच्या देदीप्यमान यशानंतर अंतराळ मोहिमांची चर्चा सर्वत्र जोरात रंगली आहे. या मोहिमा नक्की कशासाठी आखल्या आहेत, त्या कशा पार पडणार आहेत, त्यातून देशाला आणि जगालादेखील काय फायदे मिळणार आहेत त्याची माहिती घेण्यासाठी अनेक लोक उत्सुकता दाखवत आहेत, जाणकारांना प्रश्न विचारत आहेत. हे सर्व सुरू असताना आता काही अवकाश तज्ञांनी या मोहिमांच्या यशाचे कौतुक करताना भविष्यातील धोक्याविषयीदेखील सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हा धोका आहे अशा मोहिमांमुळे अवकाशात निर्माण होत असलेल्या हजारो टन वजनाच्या कचर्याचा. पृथ्वीवर जसा कचऱयाचा मानवी आरोग्याला धोका आहे, अगदी तसाच अंतराळातील कचऱयाचादेखील धोका आहे. खरे तर हा अंतराळातील कचरा मानवासाठी जास्त धोकादायक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जगभरातील अनेक देश अवकाश मोहीम राबवत आहेत. त्यासाठी कित्येक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत, जे आजही त्यांच्या कक्षेत फिरत आहेत. अवकाश मोहिमांसाठी अनेक कृत्रिम वस्तू अवकाशात सोडल्या जातात. मात्र त्यांचे कार्य पूर्ण झाले की, या निर्जीव वस्तू तशाच अवकाशात फिरत राहतात आणि अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात होते. सध्या अवकाशात असा 8,400 टन कचरा पडून आहे असे नासा या संस्थेचे म्हणणे आहे. हा कचरा ताशी 18 हजार ते 28 हजार मैल या वेगाने पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे हे खरे काळजीचे कारण आहे. या कचऱयामध्ये रॉकेटचे पुढचे कोन, रॉकेटचे स्टेज, बोल्ट, इंधन टाक्या, पेलोडचे कव्हर्स, बॅटरी, लाँचिंगच्या वेळी वापरात येणारी इतर सामग्री अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. यातील अनेक वस्तू या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करत आहेत आणि त्यांचा वेगदेखील अतिप्रचंड आहे. अशी एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेनं आल्यास मानवासाठी प्रचंड मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नासा यासंदर्भात काही उपाययोजना राबवीतदेखील आहे.