वेब न्यूज – जावयांचे गाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर विविध रंजक किस्से, कथा, अद्भुत माहितीची भर पडणे हे कायम घडत असते. बऱयाचदा काहीशा अजब वाटणाऱया, पण सत्य असणाऱया कहाण्या समोर येत असतात. काही वर्षांपूर्वी एका गावाच्या माहितीने अशीच धमाल उडवली होती आणि आता पुन्हा एकदा ते गाव जोरदार चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यातील या गावाचे नाव आहे हिंगूलपूर. हे गाव ‘दामादों का पुरवा’ अर्थात जावयांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

लग्न झाले की, मुलगी सासरी जाणे ही आपल्याकडे रीत आहे. आपण ही पद्धत सर्वत्र पाहत असतो. मात्र हिंगूलपूरमधल्या मुली लग्न झाल्या की, सासरी जात नाहीत; तर जावईच कायमचे सासरी येऊन राहतात. एकेकाळी उत्तर प्रदेश हा भ्रूणहत्या आणि हुंडाबळींच्या गुह्यात आघाडीवर होता. हिंगूलपूरदेखील अशा गुह्यांमध्ये मागे नव्हते. अनेक बदनाम गावांच्या यादीत वरच्या स्थानावर त्याचे नाव होते. मात्र काही दशकांपूर्वी गावातील ज्येष्ठ, सुजाण नागरिक एकत्र आले आणि त्यांनी लग्नानंतरदेखील मुलीचा सांभाळ करण्याची, तिला आणि जावयाला आपल्याच घरात ठेवण्याची अजब पद्धत चालू करण्याचा निर्णय घेतला.

गावाने घेतलेल्या या निर्णयात येथील मुस्लिम समुदायाचादेखील मोठा वाटा आहे. इथल्या मुलीशी लग्न करायचे तर घरजावई होणे ही पहिली अट असते. मात्र अशा अजब अटीमुळे मुलगी बिनलग्नाची राहण्याची, पुढे तिच्यावर आर्थिक संकट येण्याची शक्यतादेखील अधिक असते. त्यामुळे इथे मुलीच्या शिक्षणावर खास लक्ष दिले जाते. शिक्षणाबरोबर तिला शिवण-टिपण अशासह कोणत्या ना कोणत्या कामाचे खास प्रशिक्षणदेखील दिले जाते. पुढे जाऊन मुलगी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर असावी हा त्यामागचा उद्देश असतो. विशेष म्हणजे गावात आलेल्या नव्या जावयालादेखील काही कामधंदा मिळावा आणि तो कमावता व्हावा यासाठी संपूर्ण गावातर्फे प्रयत्न केले जातात. मध्य प्रदेशमधील बितली गावातदेखील ही अनोखी परंपरा चालू आहे.