वेब न्यूज – युद्धाचे पडसाद

>> स्पायडरमॅन

युद्ध हा कोणत्याही वादावरचा उपाय नव्हे इथपासून ते हातात शस्त्र धरणे हा सर्वोत्तम पर्याय, अशा विविध विचारांचे लोक जगभरात आढळतात. काही देशदेखील हिंसेच्या विचारांचे समर्थन करताना दिसतात. सध्या अशाच विचारसरणीमुळे जग युद्धाच्या ढगांखाली झाकोळले गेले आहे. इस्रायल आणि गाझामधील युद्धाचे पडसाद आता विविध ठिकाणी तीव्रतेने उमटू लागल्याचे दिसून येते. गूगल कंपनीविरुद्ध निदर्शने करणाऱ्या कंपनीच्याच काही कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नुकतीच अटक करण्यात आली. गूगल कंपनी इस्रायल सरकारला मदत करत असल्याचा आरोप करीत काही कर्मचाऱयांनी कंपनीच्या कॅलिपहर्निया आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयात घुसून निदर्शने केली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट झाल्याचेदेखील सांगण्यात येते. दोन्ही कार्यालयांतून एकूण 9 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी निदर्शकांना कामावर परत जाण्याचे आवाहन केले. मात्र निदर्शकांनी त्याला नकार देताच त्यांना अटक करण्यात आली. एका निदर्शकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून समाजमाध्यमांवर अपलोड केला आणि चर्चेला तोंड फुटले. या सगळ्या निदर्शनामागे गूगल आणि अॅमेझॉन या दोन दिग्गज कंपन्यांमधील एक करार असल्याचे सांगितले जाते. अॅमेझॉन कंपनी ही इस्रायल सरकारला क्लाऊड आणि डाटा अशा सेवा पुरवते. या कंपनीशी गूगलने 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा करार केलेला आहे. हा करार मागे घेण्यासाठी आणि गूगलच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने आयोजित करण्यात आली होती. कंपनीच्या धोरणाला विरोध दर्शवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईसाठी गूगल ठाम आहे. तर दुसरीकडे आमचे म्हणणे ऐकून न घेता आम्हाला अटक झाली, असा निदर्शकांचा आरोप आहे.