वेब न्यूज – मुंबईला मिळणार MANAS

>> स्पायडरमॅन

दिल्लीला पडलेल्या प्रदूषणाच्या विळख्याची सध्या देशभरात चर्चा आहे. दिल्लीकर दूषित हवेशी झुंज देत असताना हिंदुस्थानातील अनेक शहरांनादेखील खराब हवेचा सामना करावा लागत आहे. आपल्या आजूबाजूला नक्की किती प्रदूषण आहे, आपण किती धोकादायक हवेत श्वास घेत आहोत हे अनेकदा सामान्य माणसाला समजणे कठीण असते. हवेची शुद्धता पातळी मोजण्यासाठी AQI अर्थात Air Quality Index चा वापर केला जातो. याची तपासणी करण्यासाठी शहरांमध्ये विविध ठिकाणी मोठी स्टेशन्स उभारलेली असतात. मुंबई महापालिका मात्र आता हवेची शुद्धता मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात AI (आर्टिफिशल इंटेलिजन्सचा) वापर करणार आहे.

मुंबईमध्ये प्रदूषणाचा स्तर मोजणारी 28 स्टेशन्स आहेत. मात्र आता जून 2026 पर्यंत मुंबईमध्ये मुंबई एअर नेटवर्क फॉर अॅडव्हान्स्ड सायन्सेस (MANAS) ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. ही यंत्रणा केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेच्या बरोबरीने काम करणार आहे. AI वर आधारलेली ही यंत्रणा IIT कानपूरच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे मिळणारी सर्व माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वेब पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसेच सामान्य नागरिकदेखील आपल्या मोबाईल अथवा संगणकाच्या मदतीने आपल्या भागातील AQI सहजपणे तपासू शकणार आहेत.

शहरातील प्रदूषण मोजणारी स्टेशन्स ही संपूर्ण परिसराचे प्रदूषण मोजतात आणि अशा वेळी लहान लहान भागात अचानक वाढणारे प्रदूषण हे बरेचदा मोजले जात नाही. मात्र आता मुंबईमध्ये या सिस्टमसाठी विविध भागांत 75 नवी सेन्सर्स लावली जाणार आहेत, जी अगदी लहानसहान विभागातील प्रदूषणाचीदेखील अचूक माहिती देऊ शकणार आहेत. मुख्य म्हणजे कोणत्या भागात कोणत्या कारणाने, जसे की, बांधकाम, ट्रफिक जाम, कारखान्यातून निघणाऱया धूर प्रदूषणात वाढ होत आहे हे महापालिकेला त्वरित समजणार आहे.