
स्पायडरमॅन
दसरा हा सण संपूर्ण देशात मोठय़ा आनंदाने साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा विजय म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. आजच्याच दिवशी रामाने रावणाचा वध करून माता सीतेला मुक्त केले होते. रामाचा हा विजय आपण मोठय़ा धूमधडाक्यात आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन करून साजरा करत असतो. देशाच्या कानाकोपऱयातून सोशल मीडियावर एकमेकांना दसऱयाच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम चालू असताना उत्तर प्रदेशातील एका गावाचीदेखील मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत आहे. या गावात दसऱयाला रावणाचे दहन केले जात नाही. उलट या गावात रावणाचे मंदिर उभारलेले आहे आणि त्यामुळेच हे गाव चर्चेत आले आहे.
ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशात झाल्याचे मानले जाते, त्याचप्रमाणे रावणाचा जन्मदेखील उत्तर प्रदेशात झाल्याची काही लोकांची मान्यता आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिह्यातील बिसरख गावातील नागरिकांची ही मान्यता असून ते स्वतःला रावणाचे वंशज मानतात. ते दसरा हा सणदेखील साजरा करत नाहीत. इथे असलेल्या रावणाच्या मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध पावले आहे. इथे असलेल्या रावणाच्या मंदिरात एक शिवलिंग आहे. हे मंदिर भगवान महादेवाला समर्पित करण्यात आले आहे. रावणाचे आजोबा पुलत्स्य यांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याचे मानले जाते. रावणाचे वडील कृषी विश्रवा आणि स्वतः रावणाने या शिवलिंगासमोर तपस्या केल्याची आख्यायिका इथे सांगण्यात येते.
रावणाने आपले शिक्षणदेखील इथेच पूर्ण केल्याचे मानले जाते. रावणाच्या नंतर कुंभकर्ण, शूर्पणखा आणि बिभीषण यांचा जन्मदेखील इथेच झाल्याचे स्थानिक सांगतात. खूप वर्षांपूर्वी इथे रावणदहनाचा कार्यक्रम झाला होता. मात्र त्यानंतर गावावर मोठे संकट कोसळल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यावेळच्या वयस्क लोकांनी मंत्रोच्चारासह रावणाची पूजा केली आणि संकट टळल्याची गोष्ट आजही इथे सांगण्यात येते. राजधानी दिल्लीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरचे हे गाव सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे.