वेब न्यूज : मानवसदृश रोबोटस्चे भविष्य

465

सध्याच्या काळात मानवसदृश्य रोबोटस् बनवण्याचा मोठा ट्रेंड आलेला दिसतो आहे. हुबेहूब मानवासारखे दिसणारे, हालचाली करणारे आणि बोलणारे रोबोटस् हे याआधी आपण फक्त कथा, चित्रपट किंवा मालिकांमध्येच पाहत आणि अनुभवत होतो. मात्र पडद्यावरचे हे रोबोटस् आता प्रत्यक्षात अवतरू लागले आहेत आणि ‘सोफिया’सारख्या रोबोटच्या निर्मितीनंतर तर या मानवसदृश्य रोबोटस्चे आणि मानवांचेही भविष्यातील संबंध कसे असतील यावर शास्त्रज्ञ गहन विचारात पडलेले आहेत. हाँगकाँगच्या हॅनसन रोबोटिक्स या तंत्रज्ञान कंपनीने आर्टिफिशल इंटेलिजन्सवरती आधारित ‘सोफिया’ या मानवसदृश रोबोटची निर्मिती केल्यानंतर तर या चर्चेला अधिकच जोर आला आहे. ‘सोफिया’ नुसतीच मानवसदृश्य रोबोट नाही, तर ती थेट तुमच्या डोळय़ात डोळे घालून चर्चा करू शकते, गप्पा मारू शकते. तिचा वापर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठीदेखील करता येतो हे विशेष. सॉफ्टबँकच्या पेपर रोबोटस्पेक्षा ‘सोफिया’ अधिक मानवाच्या जवळ जाणारी आणि आकर्षक असल्याने, आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिचा उपयोग करून घेण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या उत्सुक आहेत. सध्या असे सहा सोफिया रोबोटस् निर्माण करण्यात आले आहे. अर्थात अशा रोबोटस्चे उत्पादन मूल्यदेखील अवाढव्य असते हेही खरेच. रोबोटस्च्या अशा मानवीकरणावरती अनेक शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. इंटय़ूशन रोबोटिक्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्क्युलर रोबोटस्च्या अशा मानवी हावभाव करण्याविषयी आणि मानवासारखे बोलण्याच्या सवयींविषयी जादा काळजीत आहेत. त्यांची कंपनी ‘एलिक्यू’सारखे समाजोपयोगी छोटे छोटे रोबोटस् बनवते. हे रोबोटस् मुख्यतः वृद्ध व्यक्तींचे एकाकीपण दूर करण्यासाठी उपयोगात येतात. हे छोटे रोबोटस् विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि गप्पादेखील मारू शकतात. मात्र बऱयाचदा याचा वापर करणाऱया वृद्धांना हे रोबोटस् म्हणजे यंत्र आहेत, मानव नाहीत याची जाणीव करून द्यावी लागते ही खरी भीती असल्याचे डॉ. स्क्युलर मानतात.

आपली प्रतिक्रिया द्या