वेब न्यूज – टेकजायंट्सचे अजब शौक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जगभरातील टेक्नॉलॉजी अर्थात नव्या नव्या तंत्रज्ञानाच्या चाहत्यांना या क्षेत्रात घडणाऱया नव्या नव्या घडामोडी, नवे संशोधन याबद्दल जेवढी उत्सुकता असते, तेवढीच उत्सुकता या क्षेत्रातील दिग्गजांबद्दल देखील जाणून घेण्यात असते. याच तंत्रज्ञान क्षेत्रातील काही नामांकित लोकांचे अजब शौक सध्या समोर आले आहेत. अब्जाधीश असलेल्या या लोकांनी काही भन्नाट गोष्टी खरेदी करून आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सध्याचा तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणजे टेस्ला कंपनीचा चालक मालक एलॉन मस्क. एलॉन मस्कने जेम्स बॉण्डच्या गाजलेल्या ‘The Spy Who Loved Me’ चित्रपटातील भन्नाट गाजलेली सबमरीन कार 1 मिलियन डॉलर्सला खरेदी केलेली आहे. बिल गेट्स यांच्याकडे लिओनार्दो द व्हिन्सीच्या 16 व्या शतकात लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 72 पाने असून, ती त्यांनी 30 मिलियन डॉलर्स येवढय़ा किमतीला खरेदी केली आहेत. सतत चर्चेत असणाऱया फेसबुकच्या मार्क झुकरबर्गकडे चक्क एक आईसलॅण्ड असून, तो हवाई द्वीपसमुहाचा एक हिस्सा आहे. यात 393 एकरचा नुसता समुद्र किनाराच असून, उरलेल्या 377 एकरात उसाची लागवड केलेली आहे. ओरॅकलचे संस्थापक असलेल्या लॅरी ऍलिसन यांनी 2012 मध्येच तब्बल 300 मिलियन डॉलर्स खर्च करून हवाईमध्ये लनाई नावाचा आईसलॅण्ड खरेदी केला आहे. 90,000 एकर इतके याचे प्रचंड क्षेत्रफळ असून, ते जवळजवळ अर्ध्या मुंबई इतके आहे. या भूभागावर दोन सीझनला रिसॉर्ट्स आधीपासूनच बांधलेली आहेत. सुंदर पिचईंच्या आधी मायक्रोसॉफ्टचे सीईओ असलेल्या स्टीव्ह बाल्मर यांच्या मालकीची तर चक्क एक फुटबॉल टीम असून, ती त्यांनी 2 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली आहे. मेक्सिकन टेलिकॉम दिग्गज कार्लोस स्लिम यांच्याकडे जगभरातील अमूल्य अशा 65000 कलाकृतींचा साठा असून, तो जगासमोर आणण्यासाठी त्यांनी 800 मिलियन खर्च करून एक भव्य संग्रहालय उभे केले आहे.