
लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री सासूने सुनेची कौमार्य चाचणी केल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. त्याहूनही संतापजनक बाब म्हणजे या महिलेवर तिच्या दिराने बलात्कार केल्याचंही उघड झालं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मध्यप्रदेशची राजधानी इंदूर येथे घडली आहे. इंदूर येथील द्वारकापुरी येथे राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाशी मे 2017मध्ये पीडितेचा विवाह झाला होता. ही तरुणी अभियांत्रिकी शाखेची पदवीधर आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या सासूने तिची कौमार्य चाचणी करण्यासाठी तिच्यासोबत गैरवर्तन केलं. तिने विरोध केल्यानंतर तिच्या पतीने कुटुंबीय जुन्या विचारांचे असल्याने हे करणं गरजेचं असल्याचं तिला सांगितलं. त्यानंतर तिचा सासरी छळ सुरू झाला.
लग्नानंतर काही काळाने तिच्या मोठ्या दिराने तिच्यावर बलात्कार केला. तिने याची तक्रार सासूकडे करूनही सासूने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तिने ही घटना नवऱ्याला सांगितली. नवऱ्यानेही पुढे काहीही कारवाई न करता उलट तिलाच काही दिवसांनी माहेरी पाठवून दिलं. गेल्या अडीच वर्षांपासून पीडिता माहेरीच राहत असून तिने नवरा, सासू-सासरे आणि मोठ्या दिराविरोधात बलात्कार, हुंड्यासाठी छळ करणे आणि मारहाण करणे या गुन्ह्यांखाली तक्रार नोंदवली आहे.

























































