कॅमेऱ्याचा अँगल आवडला नाही, भर लग्नात फोटोग्राफरवर गोळीबार

1168

सध्या सगळीकडे लगीनसराईचा मोसम सुरू आहे. त्यामुळे कपडे, दागिने, हॉलनंतर फोटोग्राफर्सना सगळ्यात जास्त मागणी आहे. लग्नातले फोटो हटके ठरावेत म्हणून या फोटोग्राफर्सना वेगवेगळे अँगल शोधून तसे फोटो किंवा व्हिडीओ काढावे लागतात. पण, हाच बदललेला अँगल एका फोटोग्राफरच्या जिवावर बेतला आहे.

उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे व्हिडीओ कॅमेऱ्याचा अँगल चुकीचा वाटल्यामुळे फोटोग्राफरवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या गोळीबारात एक जण मृत्युमुखी पडला असून दुसरा जखमी झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, फिरोजाबाद येथील दरिगापूर गावात गुरुवारी एक लग्नसोहळा सुरू होता. या सोहळ्यात दिनेश कुमार, रोहित कुमार आणि सत्येंद्र कुमार हे तिघे जण फोटोग्राफर म्हणून आले होते. लग्नसमारंभ सुरू असताना त्याचं चित्रीकरण करण्यासाठी या तिघांमधील एक जण खुर्चीवर उभा राहिला आणि चित्रीकरण करू लागला. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक तिथे दोन इसम तिथे आले आणि त्यांनी चुकीच्या कॅमेरा अँगलवरून फोटोग्राफर्सशी वाद घालायला सुरुवात केली.

या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पण, कुणाला काहीही कळायच्या आत या दोघांपैकी एकाने बंदूक काढली आणि दोन फोटोग्राफर्सवर त्यातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर ते दोघंही तिथून फरार झाले. गोळी लागून रक्तस्राव झाल्याने रोहित कुमार या फोटोग्राफरचा मृत्यू झाला. सुदैवाने त्याचा सहकारी सत्येंद्र याला विशेष लागलं नाही. या घटनेनंतर तिथे एकच हलकल्लोळ माजला. त्याचा फायदा घेऊन हे दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावं सत्येंद्र यादव आणि कुलदीप यादव अशी आहेत. त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या