अक्कलकोटच्या प्रवेशद्वारावर साकारणार भव्य स्वागतकमान; पुण्यातील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र अक्कलकोट प्रवेशद्वार ठिकाणी लवकरच 100 फूट लांबीची आणि 55 फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक अशी भव्य स्वागतकमान उभारण्यात येणार आहे. पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने ही भव्य स्वागतकमान उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, ‘श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येतात. त्यांचे स्वागत आकर्षक कमानीने व्हावे, ही संकल्पना आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 30 वर्षांपासून पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळा सुरू आहे. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने दिसून आल्यानंतर प्रतिष्ठनाने हा निर्णय घेतला आहे. यावर सुमारे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अक्कलकोट शहरालगत सोलापूर रोडवर भव्य-दिव्य प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. 100 फूट लांबी आणि 55 फूट उंची, संपूर्ण आरसीसी बांधकाम, त्यात श्री स्वामी समर्थ, श्री दत्त महाराज आणि चोळप्पा महाराज यांच्या मूर्ती असणार आहेत. इंडस्ट्रियल फायबरद्वारे या मूर्ती होणार असून, त्याला 100 वर्षे काहीही होणार नाही. अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी पालिकेचा ठराव मंजूर केला होता.

अक्कलकोट शहरात संस्थानकालीन ‘धाकटी वेस’ व ‘थोरली वेस’ अशा दोन स्वागतकमानी होत्या. या दोन्ही कमानींचे जतन होऊ शकले नाही. धाकटय़ा वेशीचा काही भाग ढासळला होता; पण थोरली वेस सुस्थितीत होती. या कमानी अक्कलकोट नगरपरिषदेने सन 1977 साली पाडून टाकल्या. व्यापाऱयांचे मोठमोठे ट्रक येण्या-जाण्यास अडचण होत होती. जुना आडत बाजार येथे पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती होती. येथे धान्याचे ट्रक ये-जा करीत असत. त्यामुळे अडचण होत होती, असे कारण दाखवून 1977 दरम्यान थोरली वेस पाडण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेस आला. त्यावेळी नगराध्यक्ष वैजनाथ विश्वनाथ लांडगे होते. त्यांनी विरोध केला; पण नगरसेवकांनी आग्रह धरून ठराव संमत केला होता.

‘स्वामी चरित्रा’तही वेशीचा उल्लेख
‘श्री स्वामी समर्थ खंडोबा मंदिरानंतर गाववेशीसमोर (थोरली वेश) फाटकात तीन दिवस निराहार बसले,’ असा ‘स्वामी चरित्रा’त उल्लेख आहे. ती थोरली वेस कारंजा चौकातील दक्षिण पोलीस स्थानकालगत होती. स्वामींच्या अलौकिक लीलांच्या या वेशी जिवंत साक्षीदार होत्या. थोरल्या वेशीच्या दोन्ही भिंतींत मोठय़ा देवडय़ा होत्या. त्यांतील एका देवडीत स्वामी महाराज त्या फाटकाजवळ तीन दिवस बसले होते. तेथेच अहमदअलीखाँ रिसालदार नाईकवाडीने रिकामी चिलीम दिली. ‘क्यूं हुक्का पीते हो?’ असे विचारत चेष्टा केली होती. महाराजांनी ती रिकामी चिलीम ओढून दाखवून धूर काढला. अशा स्वामींच्या लीला या थोरल्या वेशीत झाल्याचे उल्लेख ‘स्वामी चरित्रा’त आहेत. त्यामुळे या थोरल्या वेशीला ऐतिहासिक महत्त्व होते.