मी जिवंत असेपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही! – ममता बॅनर्जी

4285

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य हिंदुस्थान पेटले आहे. याचे लोण राजधानी दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अधिपत्याखाली राजधानी कोलकातामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मार्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना, ‘मी जिवंत असेपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही’, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.

कोलकातामध्ये सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये तृणमूल काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चावेळी ममता बॅनर्जी यांनी राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी लागू होणार नाही, असे म्हटले.

हिंदुस्थानात अवैधरित्या राहणाऱ्या आपल्या लोकांना बांगलादेश स्वीकारणार, केली मोठी घोषणा

हा देश सर्वांचा आहे. जर सर्वांची साथ नसेल नाही तर सर्वांचा विकास कसा होईल? नागरिकत्व कायदा कोणासाठी आहे? असा सवाल उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी आम्हीही या देशाचे नागरिक आहोत असे म्हटले. सर्व धर्मांना एकत्र आणणे हा आमचा आदर्श आहे. आम्ही कोणालाही पश्चिम बंगाल सोडू देणार नाही. आम्ही निर्भिडपणे आणि शांततेने राहू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Photo – जामियात झालेल्या लाठीचार्जविरोधात मुंबईत ‘TISS’चे आंदोलन

तसेच जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. माझे सरकार उलथवून टाकायचे असेल तर खुशाल टाका. परंतु आम्ही बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. त्यांना (केंद्र सरकार) राज्यात हा कायदा लागू करायचा असेल तर माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या