
पश्चिम बंगालचे सरकार हे शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. शेतकरी विरोधातील तीनही कृषी कायदे मागे घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र भाजपला दंगलीच्या माध्यमातून बंगाल पेटवायचं आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. जेएनयूसारखी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था मोडून काढण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. बंगालची बदनामी केली जात असल्याचं त्यांनी सांगितले.
अभिजीत बॅनर्जी, अमर्त्य सेन यांना समाजात त्यांचे वेगळे स्थान आहे. पण सोमवारी भाजपकडून शिक्षणतज्ञांना लक्ष्य केले जात आहे. आता त्यांना एकटेपणा वाटू लागला आहे. राजकीय विचार मांडल्यामुळे ज्या प्रमाणे मला टार्गेट केलं जातंय त्या प्रमाणं सेन यांना देखील टार्गेट केले जात असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.



























































