
स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या कोलकाता येथील कार्यक्रमात झालेल्या प्रचंड गोंधळानंतर पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या गोंधळाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मेस्सी याच्या कार्यक्रमात झालेल्या गलथानपणामुळे बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि बिधाननगरचे पोलीस आयुक्त मुकेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. लिओनेल मेस्सी याच्या हिंदुस्थान दौऱयातील पहिला कार्यक्रम शनिवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झाला. या कार्यक्रमात फुटबॉल चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता. मेस्सी हा केवळ काही मिनिटेच मैदानात होता. फार कमी वेळ त्याला पाहता आले म्हणून नाराज झालेल्या चाहत्यांनी खुर्च्यांची तोडपह्डही केली होती.

























































