बेस्ट इंडीज! खचलेल्या विंडीजचा इंग्लंडला हरवत ऐतिहासिक स्फूर्तिदायक मालिका विजय

खचलेल्या वेस्ट इंडीज संघाला स्फूर्ती देणारा ऐतिहासिक मालिका विजय शाय होपच्या नेतृत्वाखाली मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे क्रिकेट मालिकेत 2019च्या जगज्जेत्या इंग्लंडला 2-1 नमवत त्यांनी आपली बेस्ट कामगिरी केली. तब्बल 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विंडीजने हा मालिका विजय मिळवला. 1998 मध्ये विंडीजने वन डे मालिकेत आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडला अखेरचे हरवले होते.

जोस बटलरच्या इंग्लंडचा सध्या पडतीचा काळ सुरू आहे. हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्लंडला दुबळ्या वेस्ट इंडीजनेही पराभवाची धूळ चारली. इंग्लंडला 206 धावांवर रोखल्यानंतर विंडीजला डकवर्थ लुईस नियमानुसार 34 षटकांत 188 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पावसामुळे काही खेळ वाया गेल्याने विंडीजला नवे लक्ष्य देण्यात आले होते. यजमान संघाने 31.4 षटकांत 6 बाद 191 धावसंख्या उभारून मालिकाविजय साजरा केला. यात किसी कार्टी (50), एलिक अॅथनेज(45) व रोमारियो शेफर्ड (नाबाद 41) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. इंग्लंडकडून विल जॅक्सने 3, तर गस अॅटकिन्सनने 2 फलंदाज बाद केले. रेहान अहमदलाही एक विकेट मिळाला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 40 षटकांत 9 बाद 206 धावसंख्या उभारली. पावसाच्या व्यत्ययामुळे दहा षटकांचा खेळ कमी करण्यात आला होता. यात बेन डकेटने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. याचबरोबर लियाम लिव्हिंगस्टोननेही 45 धावा केल्या, म्हणून इंग्लंडला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. वेस्ट इंडीजकडून मॅथ्यू पर्ह्ड व अल्झारी जोसेफ यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर शेफर्डला 2 बळी मिळाले. इंग्लंडची आघाडीची फळी कापून काढणारा मॅथ्यू पर्ह्ड सामनावीर तर शाय होप मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.