
पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या गुंदवली येथे मेट्रोचे गर्डर नेणाऱया क्रेनच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहे. फाल्गुनी पटेल असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या क्रेन चालकाचा अंधेरी पोलीस शोध घेत आहेत.
साकीनाका येथील रहिवासी असलेल्या तुलसी पटेल या त्याची चुलत बहीण फाल्गुनी आज सकाळी गुजरातहुन आलेले पार्सल घेण्यासाठी गुंदवली बस स्टॉप येथे उभ्या होत्या. सहा वाजताच्या सुमारास मेट्रोचे गर्डर नेणारी क्रेन जोगेश्वरी येथून दादरच्या दिशेला जात होती. भरधाव वेगातील क्रेन चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की क्रेनचे दोन तुकडे झाले. क्रेनच्या खाली आल्याने फाल्गुनी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तुलसी या जखमी झाल्या. अपघातानंतर क्रेनचा चालक विनोद यादव हा पळून गेला. या अपघाताची माहिती समजताच अंधेरी पोलीस घटनास्थळी आले. तुलसी यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी क्रेन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



























































