वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मिळणार ट्रफिकजॅममधून मुक्ती

हजारो वाहनांना तासनतास ताटकळत ठेवणाऱया वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याचा विडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उचलला आहे. या हायवेवरील वाहतूक जलदगतीने व्हावी म्हणून 100 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणे म्हणजे दिव्य समजले जाते. या हायवेवरून प्रवास करणाऱया माणसाला अत्यंत संयम ठेवावा लागतो. कारण सायंकाळनंतर या हायवेवरील वाहतूक कोंडीत फसलेल्या वाहनातील प्रवाशी दोन-तीन तासांनंतरच सुटकेचा निःश्वास सोडू शकतात. कारण अस्पष्ट लेन मार्ंकग, जंक्शनवर सिग्नलचा अभाव, खराब रस्ते ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची वैशिष्टय़े आहेत. पण एमएमआरडीएने हे चित्र बदलण्यासाठी कंबर कसली आहे.

जागतिक पातळीवरील सल्लागाराची नेमणूक
वांद्रे ते बोरिवली असा हा चार पदरी हायवे आहे. त्याचे क्षेत्रफळ 11 लाख चौरस मीटर आहे. त्यातील 5.8 लाख चौरस मीटर भागासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या हायवेवर वाहन चालकांच्या सोयीसाठी सुस्पष्ट साईन बोर्ड, जंक्शन डिझाईन, ठसठशीत लेन मार्ंकग आदी विविध कामांसाठी जागतिक पातळीवरील सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या हायवेवर ग्रीन वॉल्स, फ्लोअरिंग लँडस्केपद्वारे सुशोभीकरणही केले जाणार असून उच्च प्रतीचे दिवेही लावले जाणार आहेत.

सहा महिन्यांत कामे पूर्ण करणार
वाहतुकीची कोंडी सोडवताना पादचाऱयांच्या सुरक्षेसाठीही एमएमआरडीए पावले उचलणार आहे. सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून आवश्यक तिथे दुरूस्तीही करण्यात येणार आहे. मुख्य रस्ता आणि पदपथांमध्ये अँटी क्रॅश बॅरिअर्स, उड्डाणपुलांखालील भिंतींची आकर्षकरीत्या रंगरंगोटी, प्रसाधनगृहांची सुविधा तसेच ई-वाहनांसाठी चार्ंजगची व्यवस्था केली जाणार आहे. ही सर्व कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या