मोटरमन व गार्डच्या ड्युट्यांसाठी सॉफ्टवेअर, पश्चिम रेल्वे घेणार आयआयटीची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मोटरमन आणि गार्डच्या अपुऱया संख्येमुळे बऱयाच वेळा लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या मोटरमन व गार्ड यांची डय़ुटी लावण्यासाठी आयआयटीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे आयआयटीच्या मदतीने क्रू डिप्लॉयमेंट सिस्टीम (सीडीएस) सॉफ्टवेअर विकसित करणार आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि लोकलच्या फेऱ्या विचारात घेऊन मोटरमन व गार्डच्या ड्युट्यांचे चोख वेळापत्रक आखले जाणार आहे.

मध्य आणि पश्चिम मार्गावर दोन्हीकडे मोटरमन आणि गार्डची संख्या अपुरी असून त्यांना ओव्हरटाईम करावा लागत आहे. त्यामुळे मोटरमनच्या संघटनांची दादागिरी वाढत जाऊन त्या वारंवार संप करून प्रवाशांसह प्रशासनाला वेटीस धरत आहेत. यावर उपाय म्हणून मोटरमन आणि गार्डची संख्या आणि लोकलच्या फेऱ्या यांचा विचार करून त्यांच्या ड्युट्या लावण्यासाठी खास आयआयटीची मदत घेतली जात आहे. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकातील त्रुटी दूर होऊन नव्या पद्धतीचे वेळापत्रक अमलात येणार आहे.

आतापर्यंत वेळापत्रक तयार करण्यासाठी मोटरमन, गार्ड यांच्या संघटनांचा सहभाग असतो. अशा प्रकारे तयार करण्यात येणाऱया वेळापत्रकास मान्यता मिळण्यापासून अंमलबजावणीपर्यंत सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. पश्चिम रेल्वेवर दररोज चालणाऱ्या 1,355 फेऱ्यांसाठी साधारणपणे 382 सेट तयार केले जातात. त्यात लोकलची लिंक आणि डय़ुटीचा भाग नमूद केलेला असतो. त्यात आता आयआयटीचे सहाय्य घेण्यामुळे वेळापत्रक अधिक अचूक होईल, असा दावा केला जात आहे.

रेल्वे मंत्र्यांचा पाठिंबा
पश्चिम रेल्वेचे परिचालन विभागाचे अधिकारी शमित मोंगा यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर ही नवीन संकल्पना सादर केली होती. गोयल यांनी आयआयटीच्या मदतीने ड्युट्या ठरविण्याच्या संकल्पनेचा पुरस्कार करीत हा प्रयोग अन्य विभागांनी अमलात आणावा, अशा सूचना केल्या आहेत. जगभरात वाहतूक यंत्रणेत कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केले जात आहे.

summary- western railway use software to schedule motormen duties