जंगल सफारीवर जाताना काय खबरदारी घ्यायला हवी, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे जंगल सफारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या याबाबत आपण सजग होणे गरजेचे आहे. ताडोबा जंगल सफारीदरम्यान वाघाचा फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी केलेली गर्दी पाहता, वनविभागाला त्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला होता. त्यामुळेच जंगल सफारी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे.

साहसी लोकांसाठी जंगल सफारी हा एक उत्तम अनुभव असतो. वन्य प्राण्यांना जवळून पाहणे हा एक अनोखा अनुभव असतो. प्राणी आणि पक्ष्यांना पाहण्यापासून ते त्यांचे आवाज ऐकण्यापर्यंत, हा अनुभव जितका अद्भुत असतो तितकाच तो विनाशकारीही असू शकतो. अनेकदा लोक जंगल सफारीदरम्यान गरजेपेक्षा जास्त उत्साही होतात ज्यामुळे त्यांच्याकडून अशा चुका होतात. ज्या केवळ वन्यजीवांनाच हानी पोहोचवत नाहीत तर त्यांच्या स्वतःच्या जीवालाही धोका निर्माण होतात.

वन्यजीव पाहण्यासाठी घनदाट जंगलातून प्रवास करणे हे एक अत्यंत जबाबदारीचे काम आहे. जंगल सफारीदरम्यान आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जाणून घेऊया.

फोटो काढणे
जंगल सफारीदरम्यान लोकांना अनेकदा वन्यजीवांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे असतात. या कारणास्तव, वाहनातून वारंवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे किंवा खूप जास्त पुढे वाकून प्राण्यांचे फोटो काढणे यांसारख्या चुका टाळा. शिवाय, तुमच्या कॅमेऱ्याचा फ्लॅशलाइट खूप प्रखर नसावा. यामुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो.

मोठ्याने बोलणे
जंगल सफारी दरम्यान उत्साही वाटणे सामान्य आहे. परंतु यामुळे कधीकधी मोठ्याने बोलणे किंवा ओरडणे धोकादायक होऊ शकते. यामुळे प्राणी घाबरू शकतात आणि ते तुम्हाला धोका समजून आक्रमक होऊ शकतात. यामुळे तुमचा आणि तुमच्या गटातील सदस्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

तीव्र वासाचे परफ्यूम वापरणे
जंगल सफारीला जाताना, तीव्र वास असलेली कोणतीही गोष्ट टाळा. लोक बाहेर असताना अनेकदा परफ्यूम लावतात, परंतु जर सुगंध खूप तीव्र असेल, तर जंगल सफारी दरम्यान तो वापरणे टाळा. वन्यजीव वासाबाबत संवेदनशील असतात, जे हानिकारक असू शकते.

प्राण्यांना खाऊ घालणे
जंगल सफारी दरम्यान प्राण्यांना खाऊ घालणे ही एक चूक आहे जी तुम्ही कधीही करू नये. सामान्य अन्न प्राण्यांसाठी नसते. त्यामुळे त्यांना इजा होऊ शकते. तसेच यामुळे प्राणी तुमच्या खूप जवळ येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

याव्यतिरिक्त ही खबरदारी घ्या

  • जंगल सफारीला जाताना, पूर्ण कपडे घाला जेणेकरून तुमचे हात आणि पाय पूर्णपणे झाकले जातील. टोपी घाला.
  • भडक निळा किंवा लाल यांसारखे चमकदार रंग घालणे टाळा. यामुळे वन्यजीवांना थोडे अस्वस्थ वाटू शकते.
  • तुम्ही सोबत पाण्याची बाटली, चष्मा आणि डास प्रतिबंधक स्प्रे (शक्यतो सौम्य सुगंध असलेला) देखील आणावा.
  • जेव्हा तुमचा मार्गदर्शक तुम्हाला संवेदनशील ठिकाणी शांत राहण्यास सांगेल, तेव्हा त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.
  • अतिशय जड बॅगा घेऊन जाऊ नका. मोजके आणि आवश्यक इतकेच सामान सोबत ठेवा.
  • तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवा, कारण प्राणी आवाज किंवा हालचालींबाबत खूप संवेदनशील असतात.