
आपल्याकडे सण म्हटल्यावर गोडाधोडाचं खाणं हे ओघाने आलंच. खासकरून गणेशोत्सव सुरू झाल्यावर अनेक घरांमध्ये मोदकांचा घाट घातला जातो. मोदक तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत ही निराळी असते. मोदक हा प्रत्येक प्रांतात हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, मावा मोदक असे नानाविध प्रकार मोदकांमध्ये असते. उकडीचे मोदक करताना अनेकदा ते फसतात त्यामुळेच उकडीचे मोदक करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
सारण तयार करण्याची पद्धत:
- सर्वात आधी एका कढईत थोडे तूप गरम करा.
- त्यात किसलेले ओले खोबरे घालून थोडे परतून घ्या.
- आता त्यात बारीक केलेला गूळ घालून मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत आणि खोबऱ्यात छान मिसळेपर्यंत शिजवून घ्या.
- शेवटी यात वेलची पूड आणि बारीक केलेले सुकामेव्याचे तुकडे (काजू-बदाम) घाला.
- सारण जास्त कोरडे होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण तयार झाल्यावर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
मोदकाची उकड तयार करण्याची पद्धत:
- एका भांड्यात पाणी, थोडे तूप आणि चिमूटभर मीठ घालून उकळत ठेवा.
- पाण्याला उकळी आल्यावर गॅस मंद करा आणि हळूहळू तांदळाचे पीठ घालून सतत ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
- आता गॅस बंद करून भांड्यावर 2-3 मिनिटे झाकण ठेवा.
- पीठ थोडे कोमट झाल्यावर हाताला थोडे तूप किंवा पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून मऊ उकड तयार करून घ्या.
मोदक वळण्याची पद्धत:
- मळलेल्या पिठाची लहान गोळा तयार करा.
- हाताच्या अंगठ्याने आणि बोटांनी दाबून वाटीसारखा आकार द्या.
- या वाटीच्या मध्यभागी तयार केलेले खोबरे-गुळाचे सारण भरा.
- आता कडांना बारीक पाकळ्या पाडून त्या वरच्या बाजूने एकत्र आणून मोदकाचा टोकदार आकार द्या.
मोदक वाफवणे :
- तयार मोदक स्टीमर किंवा चाळणीवर केळीच्या पानावर अथवा सुती कपड्यावर ठेवा.
- 10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
- मोदकाची बाहेरील परत चमकदार आणि मऊ झाली की समजावे मोदक तयार आहेत.
- गरमागरम मोदकावर साजूक तुपाची धार सोडून किंवा केशर-दुधाची सजावट करून श्रीगणेशाला नैवेद्य दाखवा.(तुम्ही मोदकाच्या साच्याचा वापर करूनही मोदक बनवू शकता)

























































