व्हॉटस्ऍपवरून लोकेशनद्वारे ड्रग्जची तस्करी; लाखो रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drug-smuggling

फोनवरून किंवा छुप्प्या पद्धतीने ड्रग्जची विक्री करणे जोखमीचे ठरू लागल्यामुळे ड्रग्जमाफियांनी त्याला पर्याय म्हणून व्हॉटस्ऍपवरच आपला अड्डा सुरू केला आहे. पेडलर्सनी व्हॉटस्ऍपवर ग्रुप बनवून त्याद्वारे कॉलेज विद्यार्थ्यांना ड्रग्जची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. नशेबाज विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे व्हॉटस्ऍप ग्रुप चालविणाऱया दोघा तस्करांना अटक करून अमली पदार्थविरोधी पथकाने लाखो रुपयांचा गांजा जप्त केला.

पश्चिम उपनगरातील हायप्रोफाईल कॉलेज विद्यार्थ्यांना ड्रग्ज तस्कर वाटेल त्या किमतीत गांजा तसेच अन्य ड्रग्ज विकत असून हा गोरखधंदा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून सुरू असल्याची खबर वांद्रे युनिटला मिळाली. त्यानुसार उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, एपीआय मऱहाठे, विशाल खैरे, सुशांत बंडगर या पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर बोगस ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी गांजाची मागणी केली. त्यानुसार नऊ किलो गांजा विकण्यासाठी विलेपार्ले येथील नवीनचंद पोपटलाल कपाडिया विद्यामंदिरजवळ घेऊन आलेल्या सुनील दास (29) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, आझाद मैदान युनिटने पी. डिमेलो मार्गावर गांजाचा साठा घेऊन आलेल्या अरमन शौकत शेख (20) या तरुणाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 3 लाख 20 हजार किमतीचा 16 किलो गांजा जप्त केला.

लोकेशन देऊन ड्रग्जची डिलिव्हरी

सुनील ज्याच्यासाठी ड्रग्ज तस्करीचे काम करतो. त्याने व्हॉटस्ऍपवर नशेबाज कॉलेज विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवले आहेत. विद्यार्थी त्या ग्रुपवर पाहिजे तितक्या ड्रग्जची मागणी करतो. मग पेडलर त्याला लोकेशन मॅप पाठवतो आणि त्यानुसार त्या ठिकाणी दोघे भेटतात आणि ड्रग्जची खरेदी-विक्री केली जाते अशी माफियांची मोडस् ऑपरेंडी असल्याचे लांडे यांनी सांगितले.