….तेव्हा रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर झाडलेल्या खऱ्या गोळ्या, ‘शोले’च्या सेटवर नक्की काय घडलेलं?

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचला होता. जय (धर्मेंद्र), वीरू (अमिताभ बच्चन) आणि ठाकूर ही लोकप्रिय पात्रे, गब्बरसिंह सारखा खलनायक, हेमा मालिनीसारखी हिरोईन, जबरदस्त अॅक्शन, मनमोहक गाणी आणि लक्षवेधक संवाद यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चक्क खऱ्याखुऱ्या गोळ्या झाडल्या होत्या. ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागामध्ये बिग बी यांनीच हा किस्सा सांगितला होता.

‘शोले’ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जय-वीरू आणि गब्बरसिंह यांच्यात धुमश्चक्री दाखवलेली असून यावेळी वीरूचा मृत्यू होतो असे दाखवले आहे. हा क्लायमॅक्स सीन खरा दिसावा म्हणून रमेश सिप्पी यांनी सेटवर काही खरी काडतूस ठेवली होती. काही विशेष दृश्यांमध्ये त्याचा वापर करायला असे ठरले होते.

चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी धर्मेंद्र यांच्यावर एक सीन चित्रित केला जाणार होता. या सीनमध्ये धर्मेंद्र बंदुकीत गोळ्या भरतात आणि गोळीबार करतात असे दाखवायचे होते. हा सीन तीन वेळा रिटेक झाल्याने धर्मेंद्र चांगलेच संतापले. चौथ्यांदा हा सीन चित्रित होताना धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात चुकून बंदुकीत खऱ्या गोळ्या भरल्या आणि अमिताभ बच्चन यांच्यावर झाडल्या. सुदैवाने धर्मेंद्र यांचा नेम खराब होता आणि गोळ्या बिग बी यांच्या कानाजवळून गेल्या. यामुळे त्यांचा प्राण वाचला.

“आम्ही क्लायमॅक्सचा सीन चित्रित करत असताना धर्मेंद्रजी खाली होते आणि मी टेकडीवर उभा होतो. धर्मेंद्रजी एक पेटी उघडतात आणि काडतूस उचलतात. तीन वेळा रिटेक झाल्याने धर्मेंद्रजी वैतागले अणि त्यांनी बंदुक घेऊन त्यात खऱ्या गोळ्या भरल्या. मी टेकडीवर उभा होतो आणि गोळ्या माझ्या कानाजवळून गेल्या, सेटवर अशा गोष्टी होत राहतात”, असे हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले.