सेहवागच्या कानाखाली मारल्याने टीम इंडियात झाला होता भूकंप, गांगुलीच्या संतापाचा झाला कडेलोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर खेळाडू विरेंद्र सेहवाग सध्या हिंदुस्थान आणि इंग्लंड कसोटीदरम्यान समालोचन करताना दिसत आहे. याच सेहवागला इंग्लंड दौऱ्यावर असताना एका व्यक्तीने कानाखाली वाजवली होती आणि त्यामुळे संघातील वातावरण बिघडले होते. टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरव गांगुली याच्या संतापाचा कडेलोट झाला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी 2013 ला एका कार्यक्रमादरम्यान हा किस्सा सांगितला होता.

2002 मध्ये हिंदुस्थानचा संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक जॉन राईट होते. इंग्लंड दौऱ्यात सेहवागच्या खराब फलंदाजीमुळे राईट नाराज होते. सेहवाग सातत्याने काही चेंडूचा सामना केल्यानंतर बाद होत असल्याने राईट यांना एवढा राग आला की त्यांनी थेट सेहवागच्या कानाखाली वाजवली, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले होते.

टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या सेहवागच्या कानाखाली वाजवल्याने तत्कालिन कर्णधार सौरव गांगुली भडकला होता. त्यावेळी राजीव शुक्ला संघाचे मॅनेजर होते. जॉन राईट यांनी सेहवागची माफी मागावी अशी मागणी गांगुलीने शुक्ला यांच्याकडे केली होती. ड्रेसिंग रुमबाहेर सिगारेट ओढत असताना शुक्ला यांनी राईट यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी राईट यांनी मी एक शिक्षकाच्या नजरेतून त्याला शिक्षा दिल्याचे म्हटले होते.

द्रविडचा मोठा निर्णय, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होण्याच्या चर्चांना पूर्णविराम

राईट यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘मी फक्त त्याला धक्का मारला होता, कानाखाली नाही. तो एकच चूक सातत्याने करत होता आणि मला त्याची चूक मान्य होत नव्हती.’ राईट यांच्या स्पष्टीकरणानंतरही गांगुली आपल्या भूमिकेवर ठाम होता आणि त्यांनी सेहवागची माफी मागावी यावर अडून बसला होता.

सचिनने केली मध्यस्थी

संघातील वाद वाढत असल्याचे पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने राजीव शुक्ला यांना बाजूला नेले आणि काहीही झाले तरी राईट यांनी सेहवागला सॉरी म्हणू नये असे म्हटले. मुख्य प्रशिक्षकानेच खेळाडूची माफी मागितल्यास संघातील वातावरण आणखी बिघडेल अशी भीती सचिनला होता. यानंतर शुक्ला यांनी सेहवागशी चर्चा केली आणि सेहवागने राईट यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचे म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला होता.