भाजप मुख्यालयात तिरंगा निसटला; अमित शहांची गोची, काँग्रेसची टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात आज ७२ वा स्वातंत्र्यदिन दिन साजरा होत असतानाच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिरंगा फडकावत असताना तो निसटला आणि जमिनीवर पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यांना राष्ट्रध्वज सांभाळता येत नाही देश काय सांभाळणार अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दिल्लीत लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर भाजपच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण झेंडा फडकवण्यासाठी शहांनी स्तंभाला बांधण्यात आलेली दोरी खेचताच तिरंगा थेट त्यांच्या पायाजवळ पडला. त्यानंतर काँग्रेसने लगेच या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट केला व त्याखाली ‘ज्यांच्याकडून देशाचा झेंडा सांभाळला जात नाही ते देश काय सांभाळणार?’, अशी टीकाही केली.

‘तसेच ५० वर्षांपासून तिरंग्याचा तिरस्कार केला नसता तर त्यांचा आज असा अपमान झाला नसता. दुसऱ्यांना देशभक्तीचे प्रशस्तीपत्रक देणाऱ्यांना राष्ट्रगीताचा मानही ठेवता येत नाही’, अशी जळजळीत टीकाही काँग्रेसने या ट्वीटमध्ये केली आहे.

स्वांतत्र्यदिनानिमित्त आज देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयात प्रमुख नेते, केंद्रीय मंत्री आपल्या निवासस्थानी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुधवारी सकाळी लालकिल्ल्यावर तिरंगा फडकावत देशवासियांना संबोधित केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला.

summary…while-flag-hoisting-tiranga-fell-down-in-bjp-office