
नगर-मनमाड महामार्गालगत गॅस पाइपलाइनचे काम करणाऱया ठेकेदार कंपनीची मनमानी सुरूच असून, या कंपनीच्या कामगारांनी नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य जलवाहिनी फोडून महापालिकेचे तब्बल 13 लाख 55 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदार व त्याच्या कर्मचाऱयांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नगर-मनमाड महामार्गालगत गेल्या काही दिवसांपासून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी बुऱहानगर पाणी योजनेची जलवाहिनी या कंपनीच्या कर्मचाऱयांनी अनेकवेळा फोडली होती, त्यामुळे पाणी योजनेच्या लाभार्थी गावांना त्यावेळी पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.
आता या कंपनीने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱया पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी फोडून महापालिकेचे नुकसान केले आहे. या कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱयांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रातील नियुक्त कर्मचाऱयांचे संपर्क क्रमांकही दिले होते. मात्र, या कंपनीच्या कर्मचाऱयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी (दि. 11) विळद गावाजवळील मुख्य जलवाहिनीचा एअरवॉल्व्ह ठेकेदार कंपनीच्या पोकलेनमुळे तुटला, पाइपलाइनही फुटली. या दुरुस्तीसाठी मनपाला तब्बल 50 हजार रुपयांचा खर्च करावा लागला.
ठेकेदार कंपनीकडून वारंवार जलवाहिनी फोडण्यात येत असल्याने महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच, शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने सदर ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे सादर केला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता देत पाणीपुरवठा विभागातील अभियंता प्रदीप सदाशिव ढगे यांना प्राधिकृत केले. त्यानुसार अभियंता ढगे यांनी शुक्रवारी (दि.14) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गॅस पाइपलाइनचे काम करणाऱया पुष्पा इन्फ्रा कंपनीचे मालक श्रीकांत शुक्रे (रा. वांबोरी, ता. राहुरी) व त्यांच्या पोकलेनवरील चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


























































