पांढऱ्या बुरशीचा अन्ननलिकेवर हल्ला, आतड्यांची चाळणी केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्ली सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये पांढऱ्या बुरशीचा भयंकर मामला समोर आला आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाच्या अन्ननलिकेवर पांढरा बुरशीने हल्ला चढवला. एवढेच नाही, तर छोट्या व मोठ्या आतड्यांची या बुरशीने चाळणी केली. पांढऱ्या बुरशीमुळे अशाप्रकारे शरीरातील अवयवांना इजा होण्याचा हा दुर्मिळ प्रकार असून जगातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केला आहे.

13 मे रोजी एका महिलेला पोटदुखीच्या गंभीर त्रासामुळे सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तिला उलट्या तसेच जुलाब होत होते. कॅन्सरमुळे तिचा एक स्तन काढण्यात आला होता. आठवड्यापूर्वीच तिची केमोथेरपी संपली होती. तिला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. या महिलेचे सिटीस्कॅन केले असता तिच्या पोटात द्रव आणि वायू दिसून आला. तसेच तिच्या आतड्यांना छोटी छोटी छिद्रेही पडली होती. महिलेच्या पोटातील द्रव काढून घेण्यात आला. मात्र त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला. पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे डॉ. समीरन नंदी यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची अन्ननलिका, आतड्यांना पडलेली छिद्रे बुजवण्यात आले. आता त्यांना झालेला गॅंग्रीन नाही काढून टाकण्यात आला.

असा लागला शोध

शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या आतड्याचा तुकडा बायोप्सीसाठी पाठवण्यात आला. बायोप्सीत आतड्यांमध्ये पांढरी बुरशी असल्याचे दिसून आले. बुरशीमुळे आतड्यांची चाळणी झाल्याचे पाहून आम्ही अचंबित झाल्याचे डॉ. अनिल अरोडा डॉ समीरन नंदी यांनी सांगितले. कोरोनाच्या इलाजासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे आतड्यांना छिद्र पडल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. परंतु पांढऱ्या बुरशीमुळे आतड्यांना नुकसान पोहोचण्याची ही पहिलीच घटना असल्याचे डॉ.अरोडा म्हणाले.

रोगप्रतिकारक क्षमता घटल्याने..

कॅन्सर साठी देण्यात आलेली केमोथेरपी त्यानंतर झालेला कोरोना संसर्ग यामुळे त्या महिलेची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड कमी झाली होती सामान्यता पांढरा बुरशीचा एवढा परिणाम होत नाही परंतु या केसमध्ये मात्र अजबच प्रकार बघण्यास मिळाला असे डॉक्टर अनिल अरोडा म्हणाले