अमेरीकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांबाबत व्हाईट हाऊसने व्यक्त केली चिंता, म्हंटले…

अमेरीकेमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर व्हाईट हाऊसने आता प्रतिक्रिया दिली आहे. वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेला बोलताना व्हाईट हाऊसचे मुख्य प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेत वंश, लिंग, धर्म किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हिंसाचार होऊ शकत नाही. हे आम्हाला मान्य नाही. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि संपूर्ण प्रशासन अशा हल्ल्यांविरोधात सतर्क आहेत. अमेरिकेत होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असल्याचे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी 15 व्या स्ट्रीट नॉर्थवेस्टच्या 1100 ब्लॉकमध्ये रात्री साधारण 2 च्या सुमारास हिंदुस्थानी विद्यार्थी विवेक तनेजा (41) हा फुटपाथवर पडलेला आढळला. तो गंभीर अवस्थेत होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, तनेजा आणि एका व्यक्तीमध्ये भांडण झाले होते, त्यानंतर अज्ञाताने तनेजाला जमिनीवर फेकले आणि त्याचे डोके फूटपाथवर आदळले. 7 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पोलीस आता तनेजाच्या मृत्यूला हत्या मानत आहेत. अमेरिकेतील शिकागो येथे 6 फेब्रुवारी रोजी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सय्यद मजहिर अली असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो हैदराबादचा रहिवासी आहे. हिंदुस्थानी मिशनने अली आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने सांगितले की , पीडित विद्यार्थी अली आणि हिंदुस्थानात असलेल्या त्याच्या पत्नीच्या संपर्कात आहेत. स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये अली त्याच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याबद्दल सांगत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तीन हल्लेखोर शिकागोच्या रस्त्यावर अलीचा पाठलाग करताना दिसत आहेत.

अमेरिकेतील सिनसिनाटी ओहायो येथे एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला, त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रेयस रेड्डी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो लिंडर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकत होता. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने सांगितले की, रेड्डी याच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहोत. त्याचे वडील लवकरच हिंदुस्थानातून अमेरिकेत येतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थी नील आचार्य याचाही अमेरिकेत मृत्यू झाला. आचार्य काही दिवसांपासून बेपत्ता होता. काही तासांनंतर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक मृतदेह आढळून आला आणि त्याची ओळख आचार्य म्हणून झाली. त्याचवेळी हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी विवेक सैनी याला 16 जानेवारीला जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये एका बेघर व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. विवेक जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये एमबीए करत होता. याव्यतिरिक्त, हिंदुस्थानी विद्यार्थी अकुल धवन देखील जानेवारीमध्ये इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन (यूआययूसी) विद्यापीठाबाहेर मृतावस्थेत आढळला होता. 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. हायपोथर्मियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पीएम अहवालात स्पष्ट झाले.