जागतिक आरोग्य संघटनेची चीनला क्लिनचीट; कोरोनाचा उगम वटवाघुळांपासून झाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
who

अवघ्या जगात गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजविणाऱया कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वृहान येथील प्रयोगशाळेत नाही, तर वटवाघुळांपासून झाली. वटवाघुळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱया प्राण्यांमार्फत या विषाणूचा संसर्ग झाला असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काढल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ‘डब्ल्यूएचओ’ने चीनला एकप्रकारे क्लिनचीट दिली असून, याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

महाभयंकर कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत चीनने केली आणि जगभर हा विषाणू पसरला असा अंदाज अनेक देशांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. अमेरिकेने तर वारंवार हा विषाणू ‘चीनी व्हायरस’ असल्याचे म्हटले आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञांनाही हीच शंका आहे. मात्र, याबाबत सुरुवातीपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेबाबत संशय होता. ‘डब्ल्यूएचओ’कडून चीनची पाठराखण होत असल्याचे आरोपही झाले आहेत. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात ‘डब्ल्यूएचओ’चे पथक चीनमध्ये होते. या पथकाने वृहानला पहिली भेट दिली. वृहानमध्येच नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ‘डब्ल्यूएचओ’ने अद्याप आपला अहवाल अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. मात्र, असोसिएटेड प्रेसने हा अहवाल आज जगापुढे आणला असून, त्यात चीनला एकाप्रकारे ‘डब्ल्यूएचओ’ने क्लिनचीट दिल्याचे दिसत आहे.

चीनने हा अहवाल लिहिला -अमेरिका

‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालावर अमेरिकेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने या अहवालात निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते पाहता चीनने अहवाल लिहिण्यास मदत केली असावी, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅण्टोनी बिल्कीन यांनी केली आहे. यावर चीनने अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’वर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.