कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 

चित्रपट क्षेत्रातील स्पष्टवक्ता दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप याची ख्याती सर्वज्ञात आहे. गेल्या काही महिन्यांत एकता कपूरसह अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर त्याने बिनदिक्तपणे टीका केली होती. सध्या मात्र अनुराग भडकलाय तो हिंदुस्थानातील नामांकित संगीत कंपनीवर. अलीकडेच ‘द जगरनॉट’शी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी टी-सीरीज आणि त्याचे मालक भूषण कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

बाॅलिवूडमधील लॉबी तसेच विविध कलाकारांचे कंपू याबद्दल अनुरागने अनेकदा यथेच्छ टीका केली आहे. नुकतेच त्याने टी-सीरीज कंपनी ही कलाकाराच्या प्रतिभेला महत्त्व देत नाही असे म्हटले आहे. कलाकारांची टी सीरीजला किंमत नाही असे म्हणत त्याने भूषण कुमारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अनुरागने सांगितले की, त्यांच्या अनेक चित्रपटांचे संगीत अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु असे असले तरीही, त्या कामासाठी त्यांना खूप कमी पैसे मिळाले आहेत. ‘देव डी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘गुलाल’ सारख्या चित्रपटांचे संगीत अजूनही चाहत्यांच्या आवडत्या यादीत आहे, परंतु टी-सीरीजने त्याला त्या बदल्यात नाममात्र रक्कम दिली असे अनुराग म्हणतो.

Anurag Kashyap- अखेर अनुराग कश्यपने मुंबई सोडली, बाॅलीवूडला ‘टाॅक्सिक’ म्हणत चित्रपटसृष्टीला केला रामराम

याबद्दल अधिक बोलताना अनुराग म्हणाला, ‘त्यांनी या चित्रपटांच्या संगीतातून खूप कमाई केली, पण मला विशेष काही मिळाले नाही. ते फक्त स्टार पॉवर असेल तरच पैसे देतात, संगीताच्या गुणवत्तेसाठी नाही.’ ‘बॉम्बे व्हेल्वेट’च्या संगीतासाठी त्याला सर्वाधिक पैसे मिळाले, पण त्या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना फारसे आवडले नाही, असेही त्याने सांगितले.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारखा वेगळ्या पठडीचा चित्रपट बनवणारा अनुराग म्हणतो, टी सीरीजला संगीत समजत नाही आणि ते फक्त लोकप्रिय गाण्यांना प्रोत्साहन देतात. ते फक्त स्टार पॉवरला प्रोत्साहन देतात. तसेच कला आणि कलाकारांना ते अजिबात महत्त्व देत नाहीत.

या मुलाखती दरम्यान, अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दलही बोलला. तो म्हणतो की, मुंबई सोडून आता 4-5 महिने झाले आहेत आणि मी आता खूप आनंदी आहे.