गायक हेडफोन लावून गाणी का गातात? वाचा काय आहे कारण…

बऱ्याचदा संगीत समारंभ किंवा गाण्याच्या कार्यक्रमात आपण पाहतो की, गायक कलाकार कानाला हेडफोन लावून गाणी म्हणतात. खरंतर सगळा वाद्यवृंद त्यांच्यासोबतच असतो. त्यांच्याशी ताळमेळ साधून त्यांना गाणं सादर करायचं असतं.

मग, गाणं सादर करत असताना हेडफोन का लावत असतील? वाद्य स्टेजवर वाजत असतात, तेव्हा कलाकाराला कसं ऐकू येतं? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. Quora या सोशल साईटवर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला निनाद कवळे यांनी उत्तर दिलं आहे.

एखाद्या गायकाने हेडफोन लावून गाणं गाण्याच्या या पद्धतीला तांत्रिक भाषेत ‘मॉनिटरिंग’ असं म्हणतात. म्हणजे स्टेजवरील आवाज ऐकू येईल, अशी व्यवस्था. कलाकार जेव्हा संगीत सादरीकरणाचा आस्वाद घेत असताना त्यांना पीए म्हणजे पब्लिक अड्रेस सिस्टमवरून आवाज येतो. ज्याचं प्रक्षेपण श्रोत्यांच्या दिशेने होत असतं.

एखादा कलाकार जेव्हा स्टेजवर सादरीकरण करतो, मुख्यत: संगीत सादरीकरणावेळी स्वत: बरोबरच सोबतीच्या मंडळींच्या वाद्यांचा, गायनाचा आवाज येणं फार गरजेचं असतं. जेणेकरून व्यासपीठावरील सर्वांचा ताळमेळ कायम राहील आणि संगीत योग्य ताल आणि लयीत सादर होईल.

प्रत्येक वाद्य, आवाजाचा स्तर हा उपस्थित कलाकारांसाठी वेगवेगळा असू शकतो. यासाठी हेडफोन्स, इन-इयर मॉनिटर्स या उपकरणांचा वापर केला जातो तसेच बरेचदा स्टेजवर कलाकारांच्या बाजूला तोंड केलेले स्पीकर्स ठेवलेले दिसतात. त्याचंसुद्धा हेच प्रयोजन असतं. त्यांना ऑन स्टेज मॉनिटर्स असं म्हणतात.

बहुतेक मोठे व्यावसायिक कलाकार स्वत:चे इन इयर मॉनिटर्स जवळ बाळगतात जे खासकरून त्यांच्या कानाच्या आकाराप्रमाणे बनवलेले असतात. मॉनिटरिंग जेवढं उत्तम, तेवढं सादरीकरण उत्तम होऊ शकतं. स्टेजपासून दूर बसलेल्या परंतु आवाजाची धुरा सांभाळणाऱ्या ऑडियो इंजिनियरकडे या सगळ्याची सूत्रं असतात आणि तो कलाकारांशी मॉनिटरमार्फत संवाद साधू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या