लोखंडाला गंज का लागतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानपणापासून आपल्याला वडीलधारी मंडळी काम करण्याविषयी सांगत आली आहेत. काम केलं नाही तर लोखंडाला लागतो, तसा शरीराला गंज लागेल असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत. पण, हा गंज असतो तरी काय आणि लोखंडालाच तो कसा लागतो? याचं कारण आपण जाणून घेणार आहोत.

घरातल्या लोखंडी वस्तूंना शक्यतो पाणी लागू देऊ नका, असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. त्यात लोखंडी खलबत्त्यापासून ते मोठ्या लोखंडी पिंपापर्यंत सर्वांचाच समावेश होतो. याचं कारण असतं गंज. लोखंड वारंवार उघड्या वातावरणात किंवा ओलं राहिलं तर त्याला गंज चढतो.

मग ती वस्तू वापरण्याच्या योग्यतेची राहत नाही. हळूहळू लोखंड झिजून संपून जातं. सुरुवातीला चंदेरी रंगावर लालसर डाग पडतो आणि हळूहळू तो पसरत जातो. त्यानंतर लोखंड विरत जातं. या प्रक्रियेला संक्षारण असं म्हणतात. जेव्हा लोखंड ऑक्सिजन आणि ओलाव्याच्या संपर्कात येतं तेव्हा त्यांची परस्पर रासायनिक क्रिया होते आणि एका विशिष्ट प्रकारचं संयुग तयार होतं.

या संयुगामुळेच लोखंडाचा रंग बदलू लागतो. त्याच्यावर लाल रंगाचे चट्टे येऊ लागतात. यालाच गंज लागणे असं म्हणतात. ही संक्षारणाची प्रक्रिया फक्त लोखंडावरच नाही तर चांदी, तांबे यांच्यावरही होते. फक्त चांदी हा धातू काळा पडतो तर तांब्यावर हिरव्या रंगाची पुटं चढत जातात.