देशातील सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न- पंतप्रधान मोदी गप्प का? विरोधी पक्षनेत्यांचा संयुक्त निवेदनाद्वारे सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi

धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणासाठी अन्न, पेहराव, श्रद्धा, सण आणि भाषा यांचा वापर करून देशातील सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल एका संयुक्त निवेदनाद्वारे करत 13 प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.

देशात हिजाब, मांस, मशिदींमध्ये अजान यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह विरोधी पक्षातील 13 नेत्यांनी एका संयुक्त निवेदनाद्वार पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

समाजात द्वेष पसरवण्याच्या आणि हिंसाचार भडकवण्याच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे मौन हे आश्चर्यचकित करणारे आहे. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने खाण्याच्या सवयी, पेहराव (हिजाब), धार्मिक श्रद्धा, सण, भाषा यांचा वापर सत्ताधारी वर्गाकडून केला जात आहे तो चिंताजनक आहे. या अशा परिस्थितीत समाजातील सर्व घटकांनी शांतता राखून धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणाऱयांचा डाव हाणून पाडा, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.