लिंबू नेहमी आडवेच का कापतात? हे आहे कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयंपाक करताना अनेक छोट्या छोट्या गोष्टींचं व्यवधान पाळावं लागतं. म्हणजे अगदी कांदा चिरण्यापासून ते किचकट रेसिपींपर्यंत अनेक कृतींमध्ये काही विशिष्ट ठोकताळे स्वयंपाकाची क्रिया सोपी करतात.

या यादीत लिंबू चिरणे ही कृतीही समाविष्ट असते. नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलामुलींना लिंबू आडवे कापण्याचा सल्ला दिला जातो. कारण, लिंबू उभं कापलं तर त्यातून रस बाहेर येत नाही.

म्हणजेच लिंबू त्याच्या देठाकडून उभा न कापता तो आडवा धरून मध्यभागी कापणं योग्य असतं. त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. अनेकांना हे कारण माहीत नसतं. कोरा या प्रश्नोत्तरांच्या संकेतस्थळावर लिंबू उभा का चिरू नये या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात ते कारण दिलं आहे.

वास्तविक लिंबाच्या आतला भाग छोट्या 10 -12 पाकळ्यांचा बनलेला असतो. जशा संत्र किंवा मोसंबीच्या पाकळ्या असतात त्याचप्रकारे लिंबातही पाकळ्या असतात. अशा प्रत्येक पाकळ्यात लिबांचा गर रसासहित साठलेला असतो.

जर लिंबू उभे चिरले तर सुरी प्रत्येक खणाला भेदून प्रत्येक पाकळीच्या आरपार जात नाही. त्यामुळे अशा लिंबाच्या तुकड्याचा रस पिळल्यावर सहजासहजी बाहेर पडत नाही.

हेच जर लिंबू आडवे कापले तर सुरी प्रत्येक पाकळीला छेदून आरपार जाईल. लिंबाचा तुकडा पिळल्यावर रस सहजरित्या बाहेर पडेल. म्हणूनच लिंबाचा रस सहजरित्या पिळून काढायचा असेल तर लिंबू उभे न चिरता आडवे चिरले जाते.