काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मुरादाबाद येथून शनिवारी पुन्हा एकदा सुरू झाला. काँग्रेस नेते-खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही न्याय यात्रा सुरू झाली असून कार्यकर्त्यांसह सामान्य लोकांचाही याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे बुलडोझर हे कोणाच्या घरावर चालते?, ज्या व्यक्तीने सहा शेतकऱयांना आपल्या जीपने चिरडले त्याच्याविरुद्ध भाजपचे बुलडोझर चालवले का?, ज्याने महिलांसोबत अत्याचार केलेत त्याच्याविरुद्ध बुलडोझर चालवले का?, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी योगी सरकार आणि भाजपवर घणाघात केला.
पेंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलन करीत होते. ते आजही करीत आहेत. त्यांच्या मागण्या ऐकायला कोणी तयार नाही. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सत्ताबद्दल होईपर्यंत तुम्हाला रोजगार मिळणार नाही, सुविधा मिळणार नाहीत, पेपर लीक होणे थांबणार नाही, विकास होणार नाही, सत्ताबदल हाच यावर एकमेव उपाय आहे, असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. राहुल गांधी यांनीही भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. एका धर्माला दुसऱया धर्माशी लढवले जात आहे, एका जातीला दुसऱया जातीशी लढवले जात आहे, एका भाषेला दुसऱया भाषेशी लढवले जात आहे, 24 तास तुम्हाला लुटले जात आहे. देशात 50 टक्के मागास आहेत, 15 टक्के अल्पसंख्याक आहेत, 15 टक्के दलित आणि 8 टक्के आदिवासी आहेत, परंतु 90 टक्के संख्या असूनही देशात किती भागीदारी आहे? यात किती मीडिया या लोकांच्या हाती आहे? जास्त संख्या असूनही या लोकांना भागीदारी मिळत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.