
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजेरी लावत विविध मुद्द्यांना हात घातला. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमधील यश, पक्षाची पुढील वाटचाल, देशासमोरील आव्हानं, कश्मीर फाइल्सवरून सुरू असलेले राजकारण, रशिया-यु्क्रेन युद्ध आणि हिंदुस्थानवर त्याचा परिणाम अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी रशिया-यु्क्रेन युद्धातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुस्थानींची यु्क्रेनमधून सुखरुप सुटका यावर मोदींनी भाष्य केलं. हे ऑपरेशन कसं राबवलं, इतर देशांपैकी कुणी, कशी आणि का मदत केली याचाही उल्लेख त्यांनी केला.
मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान पोलंडचा उल्लेख केला. युक्रेनमधील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या देशांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. आजूबाजूच्या देशांना तशा प्रकारची मदत करण्याची विनंती करण्यात आली होती. ज्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला आणि हिंदुस्थानी नागरिकांना विशेषत: तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळाली. यामागचे कारण पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पोलंडने हिंदुस्थानला मदत करण्यामागे जो इतिहास आहे तो त्यांनी बैठकीत सांगितला. ‘जामनगरच्या राजाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता. त्याचा परिणाम म्हणून, आज पोलंडने युक्रेनमधील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मदत केली’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांच्या मुलांची तिकीटं कुणी कापली? पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर
‘द कश्मीर फाइल्स’ची चर्चा
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या चित्रपटावरून सर्वच स्तरावर चर्चा सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटावरून भाष्य करताना एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या आणि आता ‘द कश्मीर फाइल्स’वर गळे काढणाऱ्यांना सल्ला दिला आहे. एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आता मात्र ‘द कश्मीर फाइल्स’च्या विरोधात गळे काढत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरणारे ते लोक कश्मीर बाबतचे सत्य समोर येत असल्याने बिथरले आहेत. त्यांनी जे सत्य लपवून ठेवलं ते आता उघड झाल्याने त्यांचा विरोध होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

























































