
सामना प्रतिनिधी । मुंबई
सत्तरच्या दशकात क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजविणारा… दोन वेळा जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकाला मिठी मारणारा… जेतेपदाची हॅटट्रिक हुकल्यानंतर मैदानावर अश्रू अन् हुंदके अनावर झालेला… आणि आपल्या ‘गंगनम स्टाइल’ डान्सने क्रिकेटप्रेमींना भुरळ घालणार्या वेस्ट इंडीजचा क्रिकेटमधील दरारा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. डबघाईला आलेले क्रिकेट बोर्ड, खेळाडू व क्रिकेट मंडळामधील वाद आणि खेळाडूंमधील दुफळी यामुळे विंडीजमधील क्रिकेट खिळखिळे झालेय, मात्र तरीही कॅरेबियन बेटांवरील विंडीजचा संघ 12व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एक सरप्राइज पॅकेज असेल. त्यांचा दिवस असल्यास आपल्या धसमुसळय़ा खेळाच्या जोरावर भल्याभल्या संघांची दाणादाण उडविण्याची ताकद वेस्ट इंडीज संघात आहे.
वेस्ट इंडीजकडे ख्रिस गेल नावाचा ‘दैत्य’ फलंदाज आहे. त्याची बॅट चालली तर मग काही प्रतिस्पर्धी संघाचे खरे नाही. शिवाय एकिन लिकिस, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर, कर्णधार जेसन होल्डर यांच्यामध्ये उपयुक्त फलंदाजी करण्याची क्षमता आहे. यंदाची आयपीएल गाजविणारा बाहुबली अर्थात आंद्रे रसेल आणि कार्लोस ब्रॅथवेट, ऍश्ले नर्स यांच्यातही प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हवाई हल्ले करण्याची क्षमता आहे.
वेस्ट इंडीज संघ : जेसन होल्डर (कर्णधार), आंद्रे रसेल, ऍश्ले नर्स, कार्लोस ब्रॅथकेट, ख्रिस गेल, डॅरेन ब्राक्हो, एकिन लिकिस, फेबियन एलेन, केमार रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाइ होप, शॅनन गॅब्रियाल, शेल्डन कॉट्रेल, शिमरोन हेटमायर.



























































