शहीद वैमानिकाची पत्नी हवाई दलात

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

साधारण पाच महिन्यांपूर्वी ‘मिराज-2000’ विमान कोसळून झालेल्या अपघातात स्क्वार्डन लीडर समीर अब्रोल शहीद झाले होते. आता त्यांची पत्नी गरिमा अब्रोल यांनीही सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची (एसएसबी) परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याही लवकरच हवाई दलात सामील होणार आहेत. निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी सोमवारी ट्विटरवर ही माहिती दिली. गरिमा आधी तेलंगणा येथील दुंदिगल एअरफोर्स ऍकॅडमी जॉइन करणार असून त्यानंतर जानेवारी 2020मध्ये त्या हवाई दलाचा भाग बनतील असेही चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.

गरिमा अब्रोल यांच्याबद्दलची माहिती ट्विटरवर पोस्ट करताना निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी गरिमा आणि समीर अब्रोल यांचा फोटोही शेअर केला आहे. ‘गरिमा या असाधारण व्यक्तिमत्त्वाच्या महिला आहेत. सर्वच महिला एकसारख्या नसतात. काही जवानांच्या पत्नी असतात’, असे त्यांनी या फोटोखाली लिहिले आहे. बंगळुरूमध्ये याच वर्षी 1 फेब्रुवारी रोजी ट्रेनी लढाऊ विमान ‘मिराज-2000’ हे विमान अपघातग्रस्त झाले होते. यात विमानातील दोन्ही वैमानिक शहीद झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या