
सामना प्रतिनिधी । अलिबाग
सारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत दत्तपाडा गावापासून काही अंतरावर असणार्या आदिवासीवाडीवर डोंगरपट्ट्यात वन्य प्राण्याकडून गाय-वासरावर हल्ला झाल्याची घटना घडली. यात वासराचा जीव गेला. हा हल्ला बिबट्याचा असल्याचा गावकर्यांचा संशय असून वनाधिकार्यांनी मात्र त्यास दुजोरा दिला नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अहवालानंतरच हल्ला कोणत्या प्राण्याचा हे निष्पन्न होणार आहे.
सारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दत्तपाडा गावाच्या डोंगरपट्ट्यात बानन (बांधण) भागात डॉ. नितीन मोकल यांचे घर आहे. त्यांच्या घराची आणि गुरांची देखभाल करण्यासाठी एक कुटूंब राहत आहे. डॉ. मोकल हे कामानिमित्त बाहेरगावी राहतात. सोमवारी पहाटे गोठ्यात वन्य प्राण्याने हल्ला करून गायीला जखमी केले आणि वासराचा मात्र फडशा पाडला. कुत्र्यांच्या भुंकण्याने ते कुटूंब जागे झाले. तेव्हा त्यांना गोठ्यापासून काही अंतरावर वासराचा मृतदेह आढळला.
मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दगडे तसेच वनखात्याच्या कर्मचार्यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकार्यांनाही बोलावण्यात आले होते. डोंगरपट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्षात तसे आढळून आले नाही. सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्यातून ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याकडे पाहता बिबट्याचाच हल्ला असावा याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया वनाधिकारी विकास तरसे यांनी व्यक्त केली. घटनास्थळी भेट देणारे वनपाल आणि कर्मचारी यांनी मात्र नेमका हल्ला बिबट्याचा की तरसाचा हे पशुवैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने डोंगरपट्ट्याचे सर्वेक्षण करून त्या वन्य प्राण्याचा शोध घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

























































