
वांद्रय़ात एका शाळेत पिसाळलेल्या डुकराने आज धुडगूस घातला. दुपारी शाळेच्या पटांगणात विद्यार्थी खेळत असतानाच मोठा डुक्कर शिरल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. बिथरलेला डुक्कर सैरावैरा पळू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तासाभराच्या प्रयत्नांनंतर डुकराला पकडण्यात यश आले.
वांद्रे पश्चिम बझार रोडवरील बीपीई मराठी हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. शाळेच्या आवारात डुक्कर शिरल्यावर विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. बिथरलेला डुक्कर मिळेल त्या दिशेने पळत होता. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी काही इसम शाळेत आले. तासाभराच्या प्रयत्नांनंतर डुकराला दोरीच्या फासकीत पकडण्यात यश आले. काही जणांना चावलेल्या त्या डुकराला जेरबंद करून दुचाकीवरून नेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.





























































