
सामना प्रतिनिधी । वडीगोद्री
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील गावकऱ्यांवर रानडुकराने हल्ला करून अनेकांना जखमी केले. रानडुकराने गावात दोन तास धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या रानडुकरावर प्रतिहल्ला करून त्याला ठार केले. हा सर्व थरारक प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घडला. गावकरी वेळीच सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
बुधवारी सकाळी 7 वाजता भीमराव शेडगे घरात झोपले असता रानडुकराने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या हाताचा चावा घेत त्यांना घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर त्या रानडुकराने गावातील जुमान पठाण यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. त्यात त्यांची पत्नी शन्नोबी जुमान पठाण,मुलगी अलबीरा जुमान पठाण, अशमीरा जुमान पठाण(4) यांच्यावरही डुकराने हल्ला केला. अशमीराला तोंडात धरून उसाच्या शेताकडे घेऊन जात असताना बाजूला असलेल्या कुत्र्यांनी रानडुकरावर हल्ला चढविला. त्यामुळे रानडुकराने आशमीराला सोडून पळ काढला. त्यानंतर रानडुकराने आपला मोर्चा गावाकडे वळवला. गावातील दत्ता देवडे यांच्या गोठ्यातील गाईचा चावा घेतला. त्यानंतर जनाबाई शेवाळे यांच्या गाईवरही त्याने हल्ला केला. भीमा गाढे यांच्यावर हल्ला केला. मात्र, त्यातून ते थोडक्यात बचावले. रानडुकर येत असल्याने पाहून चंद्रकांत गाडगे यांनी पळ काढल्याने ते वाचले. गावकऱ्यांनी काठ्या घेऊन रानडुकराचा पाठलाग सुरू केला. गावातील शालीकराम बाळसराफ यांच्यावर हल्ला करणार इतक्यात त्यांनी हातातील काठीने रानडुकरावर प्रहार केला. त्यानंतर गावकऱ्यांनीही रानडुकरावर हल्ला चढवून त्याला ठार केले. त्यानंतर गावाबाहेर त्याला पुरण्यात आले.
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भीमराव शेडगे यांच्यावर संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना 10 टाके पडले आहेत. तसेच जुमान पठाण यांच्या कुटुंबीयांना अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.




























































