राजू शेट्टी आणि कन्हैय्या कुमारचा प्रचार करणार, अभिनेते प्रकाश राज यांची माहिती

सामना ऑनलाईन । बंगळुरु

अभिनेते प्रकाश राज हे बंगळुरुतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि कन्हैय्या कुमार याचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर भाजपने चांगला उमेदवार दिला तर त्याचाही प्रचार करू असेही प्रकाश राज यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान या हिंदी दैनिकासाठी दिलेल्या एका मुलाखातीत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

भाजपच्या विरोधी समजले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी बंगळुरू मध्य मधून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत आपण राजू शेट्टी व कन्हैय्या कुमार यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कन्हैय्या यांचा सहा दिवस प्रचार करण्याचे त्यांनी म्हटले आहे. आपला लढा कुठल्याच पक्षाविरोधात नसून जनतेसाठी असल्याचे त्यांनी म्हटले.

या निवडणुकीत बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजकारणात अभिनेते, वकील, अभियंते कोणीही येऊ शकतं फक्त, जनतेप्रती त्यांचे काय स्वप्न आहे याला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.