
सामना प्रतिनिधी । नगर
भाजपने नगरचे विद्यामान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ताकट केल्यानंतर गांधी समर्थकांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये सुवेंद्र गांधी यांना उमदेवारी द्यावी अशी मागणी केली. यावेळी आपण निवडणूक लढविणार असा निर्धारही सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त केला. याच मेळाव्यात खासदार दिलीप गांधी यांनी आम्ही कोणाचे विचार लादू देणार नाही असा इशारा त्यांनी विखेंचे नाव न घेता दिला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायवयाचे असल्याने आगामी काळात आपण पक्षाचेच काम करणार आहोत असे वक्तव्य जाहीर सभेत केले. या मेळाव्याला खासदार दिलीप गांधी, सुनिल रामदासी, आसाराम धुत, बाळासाहेब पोटघन, अशोक कटारीया, दिनेश लव्हाट, मनिष साठे, किशोर बोरा, अजय चितळे, नवनीत सुरपुरीया आदीसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दिलीप गांधी म्हणाले की, काहींची मुले ऐकत नाहीत मात्र माझा मुलगा ऐकतो. आपण त्याच्याशी बोलू. भाजपने तिकीट नाकारल्यामुळे गांधी यांनी आपल्या समर्थकांचा काल शहरामध्ये मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. गांधी म्हणाले, आपण जनसंघापासून पक्षाचा कार्यकर्ता असून, अनेक चढउतार पाहिले आहेत. खासदार असताना गेल्या 15 वर्षांतील कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला आहे. मतदारसंघात अनेक योजना आणल्या. शहरातही पक्ष वाढवून महापालिका ताब्यात घेतली. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर प्रथमच 68 उमेदवार उभे केले. माळीवाड्यासारख्या भागात उभे रहायला कोणी तयार नसताना सुनेला उभे केले. त्यावरूनही आपणावर टीका झाली.
आपणाला उमेदवारी मिळाली नसल्याचा आनंद शहरातील काहींना झाला. मात्र पाळणा आमच्या घरात हलला आणि फटाके त्यांच्या घरासमोर वाजले, अशी टीका त्यांनी विरोधकांचे नाव न घेता केली. अभय आगरकरांनी शनिवारी गांधींना उद्देशून, वाट कशाची बघता पक्षाचे आदेश पाळून कामाला लागण्याचा सल्ला दिला होता. त्यावर बोलताना गांधी म्हणाले, त्यांना आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. घरात विचारत नसणारे आमच्यावर टीका करतात. त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, असे नाव न घेता आगरकरांवर निशाणा साधला. पक्षाला मानणारे सर्वजण एकत्र यावेत, चर्चा व्हावी यासाठी आपण आजचा मेळावा बोलवला होता, असे सांगत त्यांनी पक्षात सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे. विखेंचे नाव न घेता गांधी यांनी त्यांच्यावरही निशाणा साधत तुम्ही येणार, तुमचे विचार आमच्यावर लादणार, हे आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले.




























































