Wimbaldon 2019 4 तास 57 मिनिटांची रंगत, विम्बल्डनची ड्रीम फायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदार लेले, लंडन

जागतिक क्रमवारीतला अव्वल सर्बियाचा जोकोविच याने आठ विम्बल्डन जेतेपदांनी समृद्ध असणाऱ्या फेडरर वर पाच सेट लांबलेल्या उत्कंठावर्धक लढतीत निसटता विजय मिळवला. 7-6,1-6,7-6,4-6,13-12 अशा पाच सेटमध्ये जोकोविचने जेतेपदाला गवसणी घातली.

क्षणाक्षणाला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बाजूने झुकणारं पारडं; फेडरर आणि जोकोविच यांनी केलेला सर्वोत्कृष्ट खेळ तसेच सुपर टायब्रेकरमध्ये जोकोविचने दाखवलेल्या संयमाने विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम फेरी चांगलीच गाजली.

2008 मधील नदाल वि. फेडरर सामन्यानंतर सर्वात जास्त वेळ चाललेली ही ऐतिहासिक विम्बल्डनची अंतिम फेरी ठरली आहे. पाचवा निर्णायक सेट तर तब्बल 100 मिनिटांहून अधिक वेळ सुरू होता. हा संपूर्ण सामना चार तास 57 मिनिटे चालला हे विशेष.

काँटे की टक्कर आणि शुष्क रेकॉर्डबुक 

या लढतीत जोकोविच जिंकला असं उद्या इतिहास सांगेल, पण फेडरर हरला असं मला आणि अनेक जणांना मुळीच पटणार नाही. केवळ पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर जिंकल्यामुळे या निकषावर जोकोविचला हे यश मिळाले. नाहीतर जोकोविच आणि फेडरर यांचा या ट्रॉफीवर समान हक्क आहे. वाईट इतकंच वाटतं की, ‘क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विजयी’प्रमाणेच विम्बल्डन रेकॉर्डबुकवर शुष्कपणे ‘जोकोविच विजयी’ इतकंच लिहिलं जाईल.

सोशल मीडियावर क्रिकेट आणि टेनिस चाहते 

त्यामागचं नाटय़, थरार, हळहळ, ती शेवटच्या शॉटपर्यंतची लढाई हे सगळं-सगळं सेंटर कोर्टवर अनुभवायलाच हवं. करोडोंनी हा अनुभव टीव्हीवर, ट्विटर, व्हॉट्सऍप, फेसबुकवर अनुभवला. मला 2008 आणि 2019 चे हे दोन्ही सामने सेंटर कोर्टवर अनुभवायला मिळाले. स्टेडियम क्रिकेटची मक्का असो किंवा टेनिसची पंढरी असो, जगभरातील टेनिस आणि  क्रिकेट चाहते एकाच वेळेस दोन्ही सामन्यांवर नजर ठेवून होते.

आक्रमक सुरुवात

जेव्हा जागतिक कीर्तीचे बलाढय़ स्पर्धक आमने-सामने येतात तेव्हा  त्यांच्यातील खेळ किती रोमांचक होऊ शकतो याचीच झलक रविवारी टेनिस आणि क्रिकेट प्रेमींनी पाहिली, जगली आणि अनुभवली. पहिल्या गेम आणि सेटपासूनच जोकोविच आणि फेडरर यांच्यात उत्तम चुरस दिसून आली. काही मोजकेच क्षण वगळता संपूर्ण सामन्यात फेडररला त्याच्या सर्व्हिसने उत्तम साथ दिली. आपली सर्व्हिस उत्तमरीत्या राखत असल्यामुळेच जोकोविचला वेळोवेळी टायब्रेकरचा आसरा घ्यावा लागला. जवळ जवळ पाच तास चाललेल्या सामन्यात फेडररने दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस एकूण सात वेळा भंग केली. त्या तुलनेस फेडररची सर्व्हिस भंग करण्यात जोकोविचला केवळ तीनदाच यश आलं.

कमजोर बॅकहॅण्ड, अनफोर्स्ड एरर्स वि. फेडरर

फेडररचा जेव्हा उदय झाला होता तेव्हा त्याने उत्कृष्टरीत्या आपल्या कमजोर एकहाती बॅकहॅण्डचं एका अस्त्र्ाामध्ये रूपांतर केलं होतं. तसेच तो कमीत कमी अनफोर्स्ड एरर्स करायचा, पण याच ‘कमजोर बॅकहॅण्ड आणि अनफोर्स्ड एरर्स’नी रविवारी ऐन मोक्याच्या वेळेस (तिन्ही टायब्रेकरमध्ये) फेडररचा घात केला. जणू कर्णाला मिळालेल्या शापाची प्रचीती त्याने आणि टेनिस चाहत्यांनी अनुभवली. या उलट जोकोविचने मात्र स्वतःची मानसिकता कणखर आणि डोकं शांत ठेवत मिळालेल्या सर्व संधी न दवडता त्यांच सोनं केलं.

दोघांच्या तंत्रातील चुरस

सर्व्हिस, फोरहॅण्ड, बॅकहॅण्ड, व्हॉली (टप्पा पडू न देता खेळलेला शॉट), नेटजवळचा खेळ,  ड्रोप  शॉट, शॉटसमधली विविधता या सगळ्यामध्ये फेडरर अक्षरशः सरस ठरला, पण मिळालेल्या संधीचा वापर, उत्तम फोरहॅण्ड, ट्विन फिस्टेड बॅकहॅण्ड, विजीगुषु वृत्ती आणि कणखर मानसिकता यांच्या जोरावर जोकोविच फेडररपेक्षा सरस ठरला आणि त्याने पाचव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावलं.  पाचव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावत तो बियाँ बोर्ग यांच्या पंक्तीत जाऊन बसला.

कणखर मानसिकता

जोकोविचने मुलाखतीत सांगितलं, जेव्हा अख्ख सेंटर कोर्ट फेडरर-फेडरर म्हणत होतं तेव्हा त्याला जोको-जोको ऐकू येत होतं. हे सांगून त्याने लक्ष विचलित न होऊ द्यायचा त्याने  क्रीडाजगताला नवीन कानमंत्र दिला आहे.