पवनचक्कीचे पाते जीपवर पडून दोघांचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवनचक्कीचे पाते घेऊन जाणाऱया कंटेनरला हेलकावा बसल्याने हे पाते जीपवर पडून दोनजणांचा मृत्यू झाला आहे. नगर-मनमाड महामार्गावरील देहरे शिवारात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सुशीला रासकर, श्याम रासकर (रा. नांदूर खंडाळा, ता. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे असून, विलास रासकर, आनंद रासकर व शिल्पा रासकर हे तिघे जखमी आहेत.

नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू असून, या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली असून, दुसऱया बाजूने काम सुरू आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने अनेक अवजड मालमोटारी, कंटेनरसह कार मोठय़ा प्रमाणावर धावत असतात. काम सुरू असल्यामुळे एकेरी असलेल्या रस्त्याने जाताना वाहतूककोंडी होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास नगरकडून मनमाडच्या दिशेने पवनचक्कीचे पाते घेऊन दोन कंटेनर या रस्त्याने जात होते.

देहरे गावाच्या अलीकडे महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. याठिकाणी पहिला कंटेनर दुभाजकाच्या ठिकाणी केलेल्या जागेतून पलीकडे गेला. मात्र, दुसरा कंटेनर दुभाजक ओलांडून पलीकडच्या बाजूने जात असताना या कंटेनरवरील पवनचक्कीचे पाते शेजारून जाणाऱया जीपवर कोसळले. यात जीपमधील दोघे जागीच ठार झाले.

श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर खंडाळा येथील रासकर कुटुंब काळूबाईचे दर्शन घेऊन घरी जात होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात मध्यरात्री झाल्याने महामार्गाच्या दुतर्फा मोठी वाहतूककोंडी झाली होती. सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पवनचक्कीचे पाते वाहून नेणारे अवजड कंटेनर रस्त्याच्या एका कडेला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.