
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उचलून धरत जोरदार आंदोलन करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफ करा नाहीतर खुर्ची खाली करा’, ‘शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेत पिकांना हमीभाव मिळालाच पाहिजे’, ‘आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्यांना नाहीत पैसे’, अशा घोषणाबाजीने विधिमंडळाचा सारा परिसर दणाणून सोडला होता.
विदर्भातील प्रमुख पीक जसे की कापूस आणि सोयाबिन यांना हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, योग्य पिक विमा संरक्षण मिळाले पाहिजे, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विरोधकांनी आज उचलून धरले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गळ्यात कपाशीच्या बिया, हातात कापशीचे तसेच सोयाबिनचे रोपटे, बॅनर घेऊन घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारच्या धोरणांवरून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष घालावे अशी मागणी करत आंदोलन केले.



























































